ठाणे- मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केला आहे. मात्र, या अहवालावर संशय व्यक्त करत कुटुंबाने तो अहवाल नाकारला असून मृतदेह अद्याप ताब्यात घेतलेला नाही. मुकेशअंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत शुक्रवारी सापडला होता. मनसुख यांचा अचानक मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली, याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. मनसुख यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता.
ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांच्या शव विच्छेदन अहवाल हिरेन कुटुंबीयांकडे दिला असून या व्यतिरिक्त कोणत्याही प्रश्नाला ठाणे पोलिसांनी उत्तर दिले नाही. तत्पूर्वी, मनसुख हिरेन यांच्या मोठ्या भावाने, घडलेल्या प्रकारामुळे आमचे कुटुंब खूप दु:खात आहे, शवविच्छेदन अहवाल आल्यावर आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, असे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी आलेल्या अहवालावर शंका उपस्थित केली आहे.
हिरेन यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. मात्र, अद्याप आत्महत्या की हत्या, याबाबत काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही. गुरुवारी रात्री हिरेन बेपत्ता झाले. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मनसुख यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा संशय त्यांच्या मित्रांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यांना चांगले पोहता येत होते. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू होऊच शकत नाही, असा दावाही केला आहे.