ठाणे - अरुंद रस्त्यावरुन जाताना गाडी मागे घेण्याच्या वादातून एका कुटुंबाला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. तसेच मारहाण करणाऱ्या टोळक्यांकडून या कुटुंबाला गाव सोडण्याची धमकी दिल्याने पीडित कुटुंब भितीच्या सावटाखाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडी मागे घेण्याच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण; कल्याणमधील प्रकार
गाडी मागे घेण्याच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याणमध्ये घडली.
कल्याणच्या सापर्डे परिसरात भुजंगराव कांबळे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास भुजंगराव यांच्या कुटुंबातील काही जण एका कारमध्ये बसून अहमदनगरला लग्नासाठी चालले होते. रात्री 9 वाजताच्या सुमारास वाडेघर सापर्डे येथील अरुंद रस्त्यामध्ये त्यांची कार काही गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने थांबवून मागे घेण्यास सांगितले. या अरुंद रस्त्यावरुन एकच गाडी जाऊ शकत असल्याने भुजंगचा पुतण्याने गाडी मागे घेतली. मात्र, त्या 13 जणांच्या टोळक्याने भुजंग यांना गाडीमधून खेचून मारहाण सुरू केली. तसेच शिवीगाळ करत भुजंग, त्यांची पत्नी, मुले आणि त्यांच्या पुतण्याला मारहाण केली. या मारहाणीत भुजंगच्या कुटुंबीयांचे दागिनेही हिसकावून घेण्यात आले. आरोपी हे सापर्डे गाव परिसरात राहणारे आहेत. ते वासू पाटील या व्यक्तीचे नातेवाईक असल्याचेही समोर आले आहे.
याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.