ठाणे - लोकल प्रवासातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे कर्मचारी असल्याचा बनाव करून प्रवास करणाऱ्या तोतया व्यक्तीला 'आरपीएफ'च्या जवानांनी ताब्यात घेतले आहे. राजन मिश्रा असे त्याचे नाव असून आरपीएफने त्याला ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ठाणे स्थानकात तोतया रेल्वे कर्मचारी अटकेत; कारवाईच्या भीतीने ओळखपत्र फेकले नाल्यात
ठाणे स्थानकात तोतया रेल्वे कर्मचाऱ्याला आरपीएफच्या जवानांनी ताब्यात घेतले आहे.
डोंबिवली येथे राहणाऱ्या राजन मिश्राने २०१७ साली त्याच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या मुकेशकुमार यादव या रेल्वेत कार्यरत असलेल्या मित्राचे ओळखपत्र चोरले होते. याबाबत सीएसएमटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तरीही या ओळखपत्रावर फेरबदल करून तो दररोज दिव्यांग डब्यातून प्रवास करीत असे. लोकल प्रवासातील तुडुंब गर्दी टाळण्यासाठी तो असे करत असे. ठाणे स्थानकात त्याला २-३ वेळा पकडण्यात आले. परंतु, दिव्यांग डब्यात पकडले गेल्यावर आपल्याकडील ओळखपत्र दाखवून आपण ग्रुप-डीचा रेल्वे कर्मचारी असून भायखळा वर्कशॉपमध्ये काम करीत असल्याचे सांगून तो स्वतःची सुटका करून घेत असे.
मात्र, शुक्रवारी आरपीएफ जवानाला त्याच्याकडील ओळखपत्रावरील फोटो पाहून संशय बळावला. त्यानुसार चौकशी करताच चपळाईने त्याने ओळखपत्र खड्यात फेकले आणि उलट आरपीएफ जवानांना अरेरावी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जवानांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हा चौकशीत त्याची तोतयेगिरी उघडकीस आली. रेल्वे प्रशासनाकडून आपल्या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या ओळखपत्रावर फोटो नसतो. तसेच हे ओळखपत्र दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. तरीही दुसऱ्याच्या ओळखपत्रावर फोटो लावून रेल्वेची फसवणूक करणाऱ्या भामट्याचे बिंग फुटले, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पांडव यांनी दिली.