ठाणेFake Ghee Seized :भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती क्र. ४ अंतर्गत येणाऱ्या पालिकेच्या बंद पडलेल्या कत्तलखान्यात जनावरांची चरबी वितळवून तूप तयार करणारे रॅकेट गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते. (environment dept action) या संदर्भात अनेक जागरूक नागरिकांनी पालिका प्रशासक आणि आयुक्त अजय वैद्य यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव यांनी कत्तलखान्याला भेट देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव, करआकारणी विभागाचे अधिकारी अधीक्षक सायरा अन्सारी यांच्यासह पालिकेच्या सुरक्षा आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकाने ईदगाहच्या कत्तलखान्याच्या मागे खाडीच्या किनाऱ्यावर असलेल्या तूप कारखान्यावर मंगळवारी २ डिसेंबर रोजी छापा टाकला. यावेळी मृत जनावरांच्या वितळलेल्या चरबीपासून तयार केलेल्या तुपाने भरलेले १५ डबे आढळले. त्यावेळी पालिकेने कारवाई सुरू केली असता रॅकेटमध्ये सहभागी लोकांनी खाडीत उडी मारून पळ काढला.
कारवाई करण्यास पोलीसही घाबरायचे :घटनास्थळावरून पालिका कर्मचाऱ्यांनी ५ मोठ्या लोखंडी कढई, शिवाय चरबीपासून बनवलेले २५० किलो तुपाचे १५ डबे जप्त केले आहेत. भिवंडी पालिकेच्या मालकीच्या कत्तलखान्यावर गेल्या अनेक दशकांपासून विशिष्ट रॅकेटचा ताबा आहे. या बंद कत्तलखान्यात बेकायदेशीरपणे कत्तल केलेल्या जनावरांची कातडी गोळा करून ठेवली जाते. याशिवाय शहराच्या कानाकोपऱ्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या छोट्या-छोट्या कत्तलखान्यांमध्ये कत्तल केलेल्या जनावरांची चरबी आणून कारखान्यात वितळवली जाते. या अवैध धंद्यावर कारवाई करण्यास पोलीसही घाबरत होते; मात्र प्राण्यांची चरबी वितळवून तूप बनविणाऱ्या कारखान्यावर पालिकेच्या पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच करण्यात आलेली कारवाई शहरात चर्चेचा विषय बनली आहे.