ठाणे :अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावात एका प्रशस्त बंगल्याची वीज पुरवठा तपासणीसाठी वीजचोरी शोध पथक गेले असता, त्या बंगल्यात राहणाऱ्या कुटूंबांनी वीजचोरी पकडण्यापूर्वीच पथकातील अधीकारी कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
महावितरणचा कर्मचाऱ्याला मारहाण अधिकाऱ्यांचे दात पाडले - या हल्ल्यात दोन महावितरण अधिकाऱ्यांचे ओठ फुटून दात पडले आहेत. तर महिला कर्मचाऱ्यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हल्लेखोर कुटुंबावर विविध कालमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दुधकर, जगदिश दुधकर, अनंता दुधकर, प्रकाश दुधकर यांच्यासह इतर अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर कुटूंबाची नावे आहेत.
वीज चोरी शोध मोहीम सुरू -कल्याण मंडळ मधील येणाऱ्या ग्रामीण भागात महावितरणकडून अंबरनाथ तालुक्यातील विविध गावांमध्ये १० पथकांच्या माध्यमातून वीज चोरी शोध मोहीम सुरू आहे. त्यातच बुधवारी दुपारच्या सुमारास कल्याण पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या आदेशावरुन साहाय्यक अभियंता योगेश मनोरे, रवींद्र नहिदे, वरिष्ठ तंत्रज्ञ अविनाश महाजन, पुनम पंड्या, मोहिनी राऊत, पुनम वाघाडे, आकाश गिरी, उत्तम पानपाटील हे पथक वीज चोरी शोधासाठी गेले होते.
वीज चोरीचे प्रमाण वाढले - आसपासच्या गावातील वीज चोरी प्रकरणांची तपासणी केल्यानंतर पथकाने लगतच्या काकडवाल गावात घराघरात जाऊन वीज चोरी शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी आरोपी दुधकर कुटुंबीयांच्या चार मजली बंगल्यामधील वीज मीटरची तपासणी पथकाने सुरू केली. बंगल्याचे मालक प्रकाश दुधकर यांचे वीज देयक पथकाने तपासले. त्यांना तेव्हा वीज वापरापेक्षा वीज देयक खूप कमी असल्याचे आढळले.
कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला -पथकाने बंगल्याची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी आपल्या बंगल्याची वीज चोरी पकडली जाईल, या भीतीने आरोपी संतोष दुधकर, जगदीश, अनंता, प्रकाश हे घरातून बाहेर आले. त्यांनी बंगल्याच्या आवारातील महावितरणच्या पुरूष, महिला कर्मचाऱ्यांना येथे तपासणी करायची नाही. तुम्ही बंगल्यातून निघा असे बोलत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अश्लिल शिवीगाळ करत दुधकर कुटूंबाने लोखंडी सळ्या, दांडके, दगडींचा वापर करुन अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला.
महावितरण कर्मचाऱ्यामध्ये खळबळ -हल्लेखोर कुटूंबांनी महावितरणचे अधिकारी योगेश मनोरे, आकाश गिरी यांना जमिनीवर पाडून लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. हल्ल्याची माहीती मिळताच कार्यकारी अभियंता धवड, उप कार्यकारी अभियंता पद्माकर हटकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे वीजवितरणचे अभियंता नहिदे हे आपल्या मोबाईलमध्ये हल्ल्याचे चित्रीकरण करताना आरोपींनी पाहताच त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावला. त्यावेळी झटापटी होऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाली.
ओठावर जोरदार ठोसा मारून दाताला गंभीर दुखापत - त्यानंतर कार्यकारी अभियंता धवड घटनास्थळी पोहचून त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना आरोपींच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी दुधकर कुटूंबांनी धवड यांच्या ओठावर जोरदार ठोसा मारून दाताला गंभीर दुखापत केली. कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू असताना गावातील एकही ग्रामस्थ आरोपींना बाजुला करण्यासाठी आला नाही. दुधकर कुटुंब पथकावर प्राणघातक हल्ला करण्याचा सतत प्रयत्न करत होते.
कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण - तपासणी पथक नेवाळी पोलीस चौकी येथे पोहचले. त्यावेळी दुधकर कुटुंबीयांमधील एक आरोपी पहिले चौकीत हजर होता. त्यावेळीही पोलिसांसमोर त्या आरोपीने पथकाला अश्लिल शिवीगाळ करत या गावात आलात तर, ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिकारी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याने अभियंता रवींद्र नहिदे यांच्या तक्रारीवरुन हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हा अधिक तपास हिललाईन पोलीस करीत आहेत. मात्र, याघटनेमुळे महावितरण कंपनीच्या कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.