ठाणे -पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी राज्यात २४ जून २०१८ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभर प्लास्टिक बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भिवंडी परिसरात प्लास्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर छापा टाकला.
भिवंडीत प्लास्टिक कारखान्यांवर पर्यावरण मंत्र्यांची धाड
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना भिवंडी परिसरातून प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सोनाळे औद्योगिक वसाहतीतील १५ पेक्षा जास्त प्लास्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली. या धडक कारवाईमुळे संपूर्ण प्लास्टिक उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र; पाटील, तावडेंसह पंकजा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आऊट?
कदम हे प्रदूषण नियंत्रण महामंडळातील विश्वासू अधिकाऱ्यांसोबत सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील गुरुदेव कंपाऊंडमध्ये गेले. या ठिकाणच्या प्लास्टिक कंपन्यांना बाहेरून टाळे असल्याचे निदर्शनास आले. कारखान्याच्या आतमध्ये नक्की काय सुरु आहे? याची माहिती मिळत नसल्याने कंपन्यांचे शटर तोडून रामदास कदम यांनी कंपन्यांमध्ये प्रवेश केला. रामदास कदम यांनी संबधित सरकारी अधिकाऱयांना घटनास्थळी बोलवून प्लास्टिक पिशव्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा - मुंबई महापालिका कर्मचार्यांना यंदाही १५ हजार रुपये बोनस
सिग्नलवर विक्रीस असलेल्या पिशव्यांवर गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथील उत्पादन कंपन्यांची नावे प्रिंट केल्याचे आढळून आले होते. मात्र, या पिशव्यांचे उत्पादन मुंबई लगतच्या भिवंडी येथे सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मला धक्काच बसला आहे. या ठिकाणी हजारो टन प्लास्टिकच्या पिशव्या, कच्चामाल , यंत्रसामुग्री जप्त केली आहे. प्लास्टिक कंपन्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.
दरम्यान, ऐन निवडणूकीच्या तोंडावर पर्यावरण मंत्र्यांची ही कारवाई नक्की कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी २० जुलै २०१७ रोजी केमिकल गोदामांवर धाड टाकून गोदामे सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र, गोदाम मालक व अधिकाऱ्यांमध्ये गुप्तगू होताच गोदाम सीलची कारवाई बासनात गुंडाळण्यात आली होती. त्यामुळे रामदास कदम यांच्या आजच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.