महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे जिल्ह्यातील धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मनाई - सारस वाडी

ठाणे जिल्हा प्रशासनाने जलसाठ्यांमधील पाण्याची वाढती पातळी आणि घडत असलेल्या अपघातांची दखल घेत, खबरदारी म्हणून धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मनाई केली आहे.

तपासणी नाका

By

Published : Jul 8, 2019, 10:29 AM IST


ठाणे - पावसाळा सुरू झाला की जिल्ह्यातील धबधब्याच्या ठिकाणी चिंब भिजण्याचा आनंद घेणारे अतिउत्साही आणि तळीराम पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील बहुतांश धबधब्यावर दरवर्षी अपघात होऊन पर्यटकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 31 जुलैपर्यंत धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मनाईचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक पोलीस प्रशासनाने बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर तपासणी नाका उभारून पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.

तपासणी नाका


काय आहे नेमके कारण?

यंदाच्या पावसाळ्यात कोंडेश्वर धबधब्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील इतर धबधब्यात अशा अनेक दुर्दैवी घटना यापूर्वीही घडल्या आहेत. निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक, तरुण, मुले व इतर नागरिकांना डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्याची ओढ लागते. शहरी आणि ग्रामीण भागातील काही अतिउत्साही पर्यटक तर मद्यपान करून करून धबधब्याच्या खोलगट भागात पोहण्यासाठी पाण्यात उतरतात. त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने तसेच काही पर्यटक पाय घसरून तर काहींचा तोल जाऊन आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करूनही, तसेच धोक्याच्या सूचनेचे फलक लावूनही, असे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्वच धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे.

'या' ठिकाणी जाण्यास आहे बंदी

जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यातील असंख्य धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. त्यामध्ये कल्याण तालुक्यातील कांबा, पावशे पाडा, खडवली नदी, गणेश घाट, तर मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, सिद्धगड, सोनावडे लेण्या, डोंगर नावे, गोरख गड, नाणेघाट, धसई डॅम, आंबे टेंबे सह आधी पर्यटनस्थळावरील धबधबे तसेच शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा, भातसा धरण क्षेत्र, दहागाव, सापगाव, खराडे नदी, माऊली किल्ला, आजा पर्वत, भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी कुंड आणि अंबरनाथ मधील कोंडेश्वर, धामणवाडी, दहीवली, सारस वाडी, सह आदी धबधब्यांच्या ठिकाणी खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details