ठाणे - हैदराबाद येथील तरुणीवरील बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणात पकडण्यात आलेल्या संशयित आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. अशा संवेदनशील गुन्ह्यात अधिकाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे होते, संशयित असलेल्या आरोपींचा एन्काऊंटर का करण्यात आला? हे चौकशीनंतरच कळेल, असे मत एन्काऊंटर स्पेशलिस्ट रवींद्र आंग्रे यांनी व्यक्त केले.
हैदराबाद प्रकरणातील आरोपींना मध्यरात्री तपास कामानिमित्त नेण्यात आले. त्यानंतर तेथून पळ काढणाऱ्या आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे. एन्काऊंटर प्रकरणी एकीकडे पोलिसांवर आरोप प्रत्यारोप होत असताना दुसरीकडे त्यांचे स्वागत देखील करण्यात आले आहे. परंतु, याबाबत संवेदनशील गुन्ह्यात अधिकाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे होते, ती घेतली गेली का? हे तपासात समोर येईल, असे मत माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्रनाथ आंग्रे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे.