ठाणे- निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना जुंपण्यात येत असते. मात्र, त्यांना देण्यात येणार्या नियुक्त्या या त्यांच्या घरापासून लांब देण्यात येतात. त्यामुळे त्यांना मतदानाच्या दिवशी सर्व प्रक्रिया पुर्ण करून घरी जाण्यासाठी रात्री उशीर होत असतो. त्यामुळे मतदानाच्या नियुक्त्या देताना शिक्षक कर्मचार्यांना त्यांच्या घरापासून जवळच्या अंतरावर नियुक्त्या देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्यावेळी शिक्षक कर्मचार्यांना निवडणूक विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी दिली. त्यात अनेक केंद्रावर महिला कर्मचार्यांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षक कर्मचार्यांना मतदानाच्या दिवशी देण्यात येणार्या नियुक्त्या या त्यांच्या घरापासून लांब लांब देण्यात येत असतात. त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरची इतर कामे पुर्ण करावी लागत असतात. त्यामुळे जास्ती वेळ खर्ची पडत असतो. परिणामी त्या कर्मचार्यांना घरी जाण्यासाठी उशीर होतो.