नवी मुंबई - नेरुळ सेक्टर ६मध्ये राहणाऱ्या वृद्ध दांपत्याने डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने जेवणासाठी ऑनलाइन पिझ्झा मागवला. मात्र वृद्ध दाम्पत्याला ५० हजाराचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. याबाबत त्यांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार करून महिना होऊनदेखील दखल घेण्यात आलेली नाही.
बाहेरून उशिरा आल्याने मागवला पिझ्झा
नेरुळ सेक्टर ६येथील मेरिडीन सोसायटीत राहणाऱ्या विष्णू (७३) व रोमी श्रीवास्तव (६६) या दाम्पत्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी ते दोघेच राहतात. २३ नोव्हेंबरला सकाळी रोमी यांचे पती विष्णू यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुपारी दोघे घरी आले. दुपारी भूक लागली असल्याने व स्वयंपाक बनवायला उशीर होऊ शकतो, म्हणून रोमी यांनी ऑनलाइन पिझ्झा मागवला. त्यांनी ऑर्डर करताच काही वेळात त्यांना एक फोन आला. त्याने बुकिंगसाठी ऑनलाइन पाच रुपये भरण्याचे सांगत त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवली. यावेळी रोमी यांनी त्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून सलग पाच वेळा १० हजार रुपयांचे व्यवहार झाले. यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुढचा संपर्क टाळला. दरम्यान, चालता येत नसल्याने व पतीच्या डोळ्याचे ऑपरेशन झालेले असल्याने त्यांनी तीन दिवसानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.