ठाणे - उल्हासनगर शहरातील महावितरणच्या एका अधिकाऱ्याने वीज बिल भरण्याच्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. वरिष्ठ तज्ज्ञ आशुतोष चिते, असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
उल्हासनगर शहरातील अनेक भागात आरोपी चिते याने ग्राहकांकडून वीज बिल भरणा म्हणून लाखो रुपये रोख रक्कम आणि धनादेश घेतले. मात्र, ग्राहाकांकडून वीजबिलापोटी गोळा केलेली रोख रक्कम आणि धनादेश महावितरण कार्यालयात जमा केली नव्हती. त्यातच उल्हासनगर रेल्वे स्थानक रोड परिसरात राहणारे मोहन रामरख्याने यांचे ९ हजार वीजबिल थकले होते. त्यावेळी पाहणी करण्यासाठी आलेल्या महावितरणचे अधिकारी आशुतोष चिते यांना वीज ग्राहक मोहन यांनी थकीत रकमेचा धनादेश दिला. मात्र, ३ महिने उलटूनही मोहन यांनी दिलेला धनादेश महावितरण कार्यालयात जमा केला नसल्याची माहिती रामरख्याने यांना मिळाली.