नवी मुंबई - शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. आज नवी मुंबईत कोरोनाचे 89 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 90 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय चौघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
सद्यस्थितीत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असून बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशात रुग्णांसाठी रुग्णालय देखील कमी पडत आहेत. त्यामुळे वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 1100 खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे प्रशसनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.
नवी मुंबईत आत्तापर्यंत 3074 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 11 रुग्ण हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 13 हजार 762 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार 263 जण निगेटिव्ह आले असून 436 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3063 इतकी आहे.
आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण -
आज 89 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात तुर्भेमधील 24, बेलापूरमधील 7, कोपरखैरणेमधील 11, नेरुळमधील 26, वाशीतील 7, घणसोलीमधील 4, ऐरोलीमधील 7, दिघामधील 3 रुग्णांचा समावेश आहे. यामधील 23 स्त्रिया व 66 पुरुष आहेत. आत्तापर्यंत नवी मुंबईत 1 हजार 848 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज नेरूळमधील 8, तुर्भेमधील 22, वाशीमधील 17,कोपरखैरणेमधील 29, घणसोलीमधील 3, ऐरोलीमधील 9, दिघ्यातील 2 अशा एकूण 90 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये 32 स्त्रिया आणि 58 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीत 1 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत 96 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.