ठाणे :शहापूर तालुक्यातील वांद्रे-भवरपाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गावाला चांगला रस्ता नसल्याने एका 8 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. ओमकार मारूती भवर असे, मृताचे नाव आहे. गावाच्या रस्त्यावर चिखल झाल्याने 8 वर्षाच्या ओमकारला पायवाटेतून खडतर प्रवास करत सरकारी रुग्णालयात न्यावे लागले. परंतु रुग्णालयात वेळेवर पोहोचू न शकल्याने उपचार मिळण्यास उशीर झाला. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा, आरोप श्रमजीवी संघटना आणि मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे.
रस्ता नसल्याने गेला जीव : मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ७५ गावपाड्यांना आजही रस्ता नाही. अनेक वर्षांपासून श्रमजीवी संघटनेकडून चांगला रस्ता मिळावा, म्हणून विविध मार्गाने आंदोलन करुन मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनेक रुग्णांना चिखलातून खडतर प्रवास करावा लागत आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होत आहे. रुग्णालयात वेळेत पोहोचू शकत नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी उशीर होतो, यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. पिवळी येथील शासकीय आश्रम शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला आपला जीव गमवावा लागला आहे.
डॉक्टरांनी मृत केले घोषित :ओमकार वांद्रे-भवरपाडा येथे कुटुंबासह राहत होता. शनिवारी तो दुपारी शाळेतून घरी परतला. त्यानंतर मित्रांसोबत खेळण्यासाठी बाहेर गेला. त्यानंतर घरी आल्यानंतर रात्री जेवण न करता झोपला. मध्यरात्री त्याच्या पोटात अचानक कळा जाणवू लागल्या. त्यानंतर त्याचे वडील आणि आजोबांनी त्याला दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. हे रुग्णालय त्यांच्या गावापासून सुमारे अडीच किलोमीटर दूर आहे. गावापासून ते रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यात चिखल झाला होता. हा चिखलाचा रस्ता तुडवत ते रुग्णालयात पोहोचले, परंतु रुग्णालय बंद होते. त्यामुळे त्यांनी १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या अघई गावातील आरोग्य केंद्रात ओमकारला नेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर ओमकारच्या तोंडातून फेस निघू लागला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्याला दाखल केले. परंतु ओमकारच्या शरीराची हालचाल बंद झाली होती. त्यानंतर ओमकारला रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सर्पदंश झाल्याची शंका : ओमकारला सर्पदंश झाला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शहापूर येथे पोहचण्यासाठी उशीर झाल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा, आरोप श्रमजीवी संघटना आणि विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
हेही वाचा-
- Nashik Road Issue : झोळीतून दवाखान्यात नेताना गर्भवतीचा मृत्यू, मृतदेह आणतानाही नातेवाईकांची अडीच किलोमीटरची पायपीट
- Tribal People Issues: रस्ता नसल्याने गरोदर महिलेला झोळीतून ६ किमी नेले! प्राथमिक सुविधा नसल्याने आदिवासींचे हाल