ठाणे -भिवंडी तालुक्यातील वसई रोडवरील खार्डी गावाच्या हद्दीतील नाल्यात एका संपादकाची हत्या करून मृतदेह टाकल्याची घटना घडली. नित्यानंद पांडे असे त्या संपादकाचे नाव आहे. ते काशीमिरा येथून प्रकाशित होणाऱ्या 'इंडिया अनबाउंड' या साप्ताहिक वृत्तपत्र व मासिक मॅक्झिनचे संपादक होते.
ठाण्यात 'इंडिया अनबाउंड'च्या संपादकाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ
नित्यानंद पांडे असे त्या संपादकाचे नाव आहे. ते काशीमिरा येथून प्रकाशित होणाऱ्या 'इंडिया अनबाउंड' या साप्ताहिक वृत्तपत्र व मासिक मॅक्झिनचे संपादक होते.
नित्यानंद पांडे हे १५ मार्चपासून बेपत्ता होते. त्याबाबत काशीमिरा पोलीस ठाण्यात शनिवारी बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. मात्र, आज सकाळी भिवंडी तालुका पोलिसांना खारबाव रोडवरील खार्डी या गावाच्या हद्दीत रस्त्यालगत एका खड्ड्यात अनोळखी मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ठाणे ग्रामीण क्षेत्रातील पोलीस ठाण्यात तपास सुरु केला होता. काशीमिरा येथील बेपत्ता व्यक्तिचे वर्णन मृतदेहाशी मिळते जुळते असल्याने त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह ओळखण्यास बोलवले. त्यानंतर हा मृतदेह नित्यानंद पांडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
ही हत्या नक्की कधी झाली ? याकरता त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार मृतदेह पुन्हा शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील, डिवायएसपी गोडबोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी घटनास्थळी व मृतदेह ठेवलेल्या इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात भेट देऊन हत्येमागील कारणांचा तपास सुरू केला आहे.