ईडी कारवाई : हा तर राजकीय दहशतवाद, प्रताप सरनाईकांच्या भेटीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
प्रताप सरनाईक हे सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आताच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र, त्यांना ते मिळाले नाही. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा हा प्रवास राहिलेला आहे.
प्रताप सरनाईकांवर ईडीची कारवाई
By
Published : Nov 24, 2020, 10:42 AM IST
|
Updated : Nov 24, 2020, 7:30 PM IST
5.40 PM
सरनाईकांसोबतच्या भेटीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया -
हे राजकीय षडयंत्र आहे. या माध्यमातून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. देशात एक प्रकारे राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही त्याला जुमानत नाही. विरोधकांकडून आणीबाणी आणण्याचा हा प्रयत्न आहे. दिल्लीतून येऊन सरनाईक यांच्या मुलालाताब्यात घेणे चुकीचे आहे. विहंग यांना नेमके कशासाठी ताब्यात घेतले आहे? हेही माहीत नाही. मी सरनाईक यांच्याशी बोललो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही बोललो आहे. - संजय राऊत
5.30 PM
ईडीच्या छाप्यानंतर आमदार प्रताप सरनाईकांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. सामना कार्यालयात ही भेट झाली.
3.45 PM
...म्हणून ते केंद्रात असलेली शक्ती वापरत आहेत - शरद पवार
लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी केंद्र सरकार सरकारी संस्थाचा वापर विरोधकांच्या विरोधात करतंय. हे योग्य नाही. आमच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांना माहितीये की, ते येथे सत्तेवर येऊ शकत नाहीत. म्हणून ते केंद्रात असलेली शक्ती वापरत आहेत.
3.25 PM
प्रताप सरनाईक आणि वायकर हा मुखवटा; खरा कलाकार कलानगरमध्ये बसलाय - नितेश राणे
मुंबईतील वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचे भुयारी गटार थेट कलानगरमध्ये जाते. ईडीचा तपास अजून थोडा खोलात जाऊन झाला आणि भुयारी गटारातून ते गेले तर, थेट कलानगरमध्ये पोचतील. मुख्य सूत्रधार हा कलनागरमध्ये बसला आहे, अशी टीका करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
3:19 PM
विहंग सरनाईक यांना ईडीकडून अटक; ईडी कार्यालयात आणले.
विहंग सरनाईक यांना ईडी कार्यालयात आणल्याची दृश्ये.
विहंग सरनाईक यांना अटक करुन ईडी कार्यालयात आणल्यानंतर ईटीव्ही भारत प्रतिनिधी माहिती देताना.
3.12 PM
विहंग सरनाईक यांची पूर्वेश सरनाईक याच्या घरी चौकशी केल्यानंतर ईडीची एक टीम विहंग यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाली. तर पूर्वेशच्या घरात ईडीची एक टीम अजूनही तपास करत आहे. सरनाईक यांच्या वसंत लॉन्समधील घरात त्यांच्या पत्नी, मुलगा पूर्वेश सरनाईक आणि त्यांच्या पत्नी आहेत. त्यांचीदेखील चौकशी अद्याप सुरू आहे.
1.00 PM
विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचे पथक वसंत लॉन या प्रताप सरनाईकांच्या दुसऱ्या घरी पोहोचले आहे.
12.45 PM
प्रताप सरनाईक काही साधुसंत नाही - नारायण राणे
"प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाहीय," असे मत भाजपा खासदार नारायण राणे यांनी सरनाईक यांच्यावर पडलेल्या ईडीच्या छाप्याबाबत व्यक्त केले. तसेच कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्याशिवाय याबाबत बोलणे उचित ठरणार नाही, असेही ते म्हणाले.
12.30 PM
ही कारवाई राजकीय आकसापोटी - थोरात
ही कारवाई राजकीय आकसापोटी करण्यात आल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये अशा प्रकारचे छापे का नाहीत पडत? हे सर्व संशयास्पद असून याचा निषेध करायला हवा, असेही ते म्हणाले.
12.00 PM
विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात..
प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ठाण्याच्या हिरानंदानी येथील निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. विहंग सरनाईक है प्रताप सरनाईक यांचे लहान पुत्र असून, त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव पूर्वेश सरनाईक असे आहे. विहंग यांच्या नावाने विहंग कन्स्ट्रक्शन हा त्यांचा व्यवसाय चालतो, तर पूर्वेश हे युवा सेनेचे सचिव आहेत. ठाण्यातल्या हिरानंदानी इस्टेटमधील त्यांच्या घरातून विहंग यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ठाण्यातल्या इतर ठिकाणी अजूनही छापा सत्र सुरूच आहे.
11.35 AM
भाजपच्या लोकशाहीमध्ये जास्त व्होकल होणे धोकादायक - भुजबळ
ईडीच्या कारवाईबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, की भाजपच्या शासनामध्ये जास्त व्होकल होणे धोकादायक ठरत आहे. कोणी त्यांच्याविरोधात काही बोललं की, अशा प्रकारे कारवायांना सुरूवात होते. ही त्यांच्यादृष्टीने दडपशाही नसेल, तरी लोकशाहीच्या दृष्टीने ही दडपशाहीच आहे, असे मत भुजबळांनी व्यक्त केले.
भाजपच्या लोकशाहीमध्ये जास्त व्होकल होणे धोकादायक - भुजबळ
11.30 AM
ईडीकडे पुरावे असतील म्हणूनच छापे - फडणवीस
ईडीकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील, म्हणूनच ही कारवाई केली जात आहे. याबाबत मला अधिक माहिती नाही. प्रताप सरनाईकांनी चूक केली नसेल, तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. मात्र चूक केली असेल तर संबंधित संस्था कारवाई करणारच, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले आहे.
11.20 AM
आणखी नेते रडारवर..
प्रताप सरनाईक यांच्यासोबत आणखी सेना नेतेही ईडीच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. सध्या मुंबईत दहा ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे.
11.16 AM
केंद्रीय सत्तेचा वापर करुन भाजप नामर्दानगी दाखवत आहे - संजय राऊत
प्रताप सरनाईक घरी नसताना, त्यांची मुलं घरी असताना अशा प्रकारे कारवाई करुन ईडीने नामर्दानगी दाखवली आहे. भाजप आपल्या केंद्रातील सत्तेचा गैरफायदा घेत आहे. मात्र, आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही. केवळ नोटीस पाठवण्यावर न थांबता तुम्ही अटक जरी केली तरी आम्ही झुकणार नाही. या प्रकरणाची सुरुवात तुम्ही केली असेल, तरी शेवट आम्ही करणार आहे. ईडीची ही कारवाई हे केवळ राजकारण आहे. आज दिल्लीवरुन पथक पाठवण्यात आले आहे, उद्या इंटरपोलकडून जरी पाठवले, तरी चालेल. मात्र एवढं स्पष्ट आहे, की ही केवळ सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. या कटामुळे महाविकास आघाडी सरकारला काही फरक पडणार नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले.
केंद्रीय सत्तेचा वापर करुन भाजप नामर्दानगी दाखवत आहे - संजय राऊत
11.10 AM
आकसापोटी कारवाईचा आरोप..
दरम्यान, शिवसेना कार्यकर्त्यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. केवळ आकसापोटी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.
घर आणि कार्यालयावरही छापे..
प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातल्या दोन घरांवर, कार्यालयावर तसेच त्यांच्या मुंबईतील घरांवरही ईडीचे पथक छापे मारत आहे. ठाण्यातील त्यांची दोन घरे वसन लॉन्स आणि हिरानंदानी इस्टेट परिसरामध्ये आहेत. याशिवाय त्यांच्या देव कॉर्पोरा ठिकाणी कार्यालय आहे, ज्या ठिकाणी छापे पडले आहेत.
11.00 AM
अशा कारवाईचं स्वागत करायला हवं - किरीट सोमय्या
सरनाईक हे जर बेनामी कंपनी, मनी लॉंड्रिंग अशा प्रकारची कामे करत असतील, तर त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईचे स्वागत करायला हवे असे मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले.
अशा कारवाईचं स्वागत करायला हवं - किरीट सोमय्या
10.45 AM
सरनाईक परदेशात..
सध्या प्रताप सरनाईक हे मुंबईत आपल्या निवासस्थानी नसून, परदेशात असल्याचे कळत आहे.
दिल्लीचे पथक..
आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी करण्यात आलेली कारवाई ही ईडी च्या दिल्लीच्या पथकाने केली आहे. या पथकासोबत सीआरपीएफचे पथक देण्यात आले आहे.
ठाणे :शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ईडीचे छापे पडले आहेत. सकाळी आठ वाजेपासून याठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा छापा
कोण आहेत प्रताप सरनाईक?
प्रताप सरनाईक हे सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. आताच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, त्यांना ते मिळाले नाही. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा हा प्रवास राहिलेला आहे.
परिवारही राजकारणात -
सध्या त्यांचे दोन नंबरचे पुत्र पूर्वेश हे विद्यमान नगरसेवक आहेत. तर त्यांची पत्नी परिशा सरनाईक या देखील दोन वेळा नगरसेविका म्हणून ठाणे महापालिकेत निवडून आल्या आहेत. तसेच त्यांचे मोठे पुत्र विहंग सरनाईक हे मागील निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र, व्यावसायासाठी त्यांना वेळ मिळत नसल्याने त्यांनी अखेर राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवाय सध्या ते एमसीएमचे सदस्य देखील आहेत.
राजकारणाशिवायही अनेक क्षेत्रात जम...
प्रताप सरनाईक हे राजकारणात सक्रीय तर आहेतच. शिवाय बांधकाम व्यावसायिक म्हणूनही त्यांचे नाव सुपरिचित आहे. याशिवाय वर्तकनगर, घोडबंदर या भागात त्यांचे हॉटेल्सदेखील असून, हॉस्पिटल व्यवसायात देखील ते आता उतरले आहे. शिवाय शिक्षण क्षेत्रात उतरुन सध्या घोडबंदर भागात त्यांच्या शाळेचे कामही सुरु झाले आहे. याशिवाय मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपला जम बसविण्याचा प्रयत्न केला आहे.