ठाणे : ठाणे शहराची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या (टीएमटी) परिवहन सेवेच्या दररोजच्या कारभाराला ठाणेकर कंटाळले आहेत. टीएमटीच्या वागळे आगारातील जवळजवळ सर्वच बसेस भंगारात जमा झाल्याने प्रवाशांची सारी मदार कंत्राटदाराच्या बसेसवर आहे. हे चित्र आता बदलण्याची चिन्हे दिसत असुन लवकरच ठाणेकरांना नविन बसेस मिळणार आहेत.
१२३ ई- बसेस मिळणार :'ब्रीथ ईझी, झिरो इंमिशन, नो नॉईज' अशा पर्यावरणपूरक १२३ ई- बसेस मिळणार आहेत. असे असले तरीही ठाण्यातील टीएमटीच्या ताफ्यात असलेली पहिली ईव्ही बस मात्र ठाण्यातील वागळे इस्टेट डेपोमध्ये धूळ खात पडली आहे. पालिका प्रशासनाने करोडो रुपये खर्चून घेतलेली ही बस जास्ती जास्त वापरावी असे, नागरिकांना वाटते. ताफ्यात नवीन बसेस आल्यावर जुन्या बसेसकडे दुर्लक्ष नको असेही या टीएमटीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना वाटत आहे.
१२३ ई बसेस खरेदी करण्याचा निर्णय : ठाणे महापालिकेचा परिवहन उपक्रम (टीएमटी) अक्षरशः गाळात रुतला असुन महापालिकेच्या अनुदानावरच परिवहनचा डोलारा उभा आहे. तरीही ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रीकल बसेस उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. यात अत्याधुनिक ई बसेस परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. महापालिकेस प्राप्त झालेल्या अनुदानातंर्गत १२३ ई बसेस खरेदी करण्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. लवकरच ३२ ई बसेस प्राप्त होणार असून जून महिन्यापर्यत उर्वरित ९१ ई-बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत. नव्याने उपलब्ध होणाऱ्या बसेस महापालिका क्षेत्रात सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या डिझेल बसच्या मार्गिकेवर चालविण्यात येणार आहेत.