ठाणे -मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये पतंग आणि मांजे विकण्यास सुरुवात होताच मुले पतंग उडविण्यात दंग होतात. मात्र, पतंग उडविताना वापरला जाणारा मांजा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांबरोबरच पक्षांसाठी जीवघेणा ठरत आहे. मांज्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घडत असून शिवाय अनेक पक्षीदेखील गंभीर जखमी झाल्याच्या घटना दरदिवशी समोर येत आहे. त्यातच चायनीज मांजात अडकलेल्या गरुडाला शाळकरी मुलाच्या पक्षीप्रेमाने जीवदान दिल्याची घटना भिवंडी येथे घडली आहे.
दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गरुडाची सुटका -
भिवंडी शहरातील पटेल नगर येथील एका जुन्या झाडावर दोन दिवसांपूर्वी एक गरुड मांज्यात अडकून पडला होता. याच परिसरात असलेल्या अमीन आर्केड या निवासी संकुलनात राहणाऱ्या यासीर आमीर शेख या शाळकरी मुलाच्या निदर्शनात हा गरुड दिसल्याने या मुलाने गरुडाला मांज्यातून सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, झाडाची उंची ६० ते ७० फूट असल्याने त्याचे प्रयत्न तोकडे पडल्यानंतर पक्षी प्रेमी असलेल्या यासीरने ही घटना त्याचे वडील आमीर शेख यांना सांगितली. शेख यांनी तत्काळ भिवंडी अग्निशमन दलासा याबाबत माहिती दिली. अखेर अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या पक्षाची मांज्यातून सुटका करण्यात यश आले.