ठाणेDussehra 2023: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त नवीन वस्तू घेण्याची परंपरा गेली अनेक वर्ष चालत आली आहे. पितृपंधरवड्यात कोणतीही खरेदी विक्री करण्याचे टाळलं जातं व त्यानंतर येणाऱ्या दसऱ्याला आवर्जून खरेदी केली जाते. गाडी, घर किंवा सोने नाणे विकत घेण्यासाठी लोक दसऱ्याची वाट आतुरतेने पाहतात व त्यादिवशी खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार केले जातात. या दिवशी दुचाकी आणि चार चाकी वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.
'या' कंपनीच्या गाड्यांना मोठी मागणी: गेली अनेक दशके भारतामध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या चार चाकी वाहने बनवणाऱ्या कंपनीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. सुझूकी कंपनीच्या अनेक गाडयांना ग्राहक पसंत करतात व त्यांचा या ब्रँडवर विश्वास आहे. टाटानंतर जर कुठल्या वाहन कंपनीवर नागरिकांचा विश्वास आहे तर तो आहे सुझुकीवर. सध्या अर्टिगा सारख्या गाड्यांची मोठी वेटिंग लिस्ट आहे. म्हणून ग्राहकांना काही महिने त्यासाठीवाट पहावी लागते. आता देखील ही गाडी मिळवण्यासाठी ग्राहकांना तब्बल चार ते सहा महिने वाट पाहावी लागते. परंतु ग्राहक हीच गाडी घेण्यासाठी उत्सुक असतात.
उद्योगाने घेतली उसळी: कोविड काळामध्ये सर्वच उद्योगधंदे ठप्प झाल्याने, वाहन उद्योगाला देखील उतरती कळा लागली होती. परंतु आता कोविड नंतर मात्र या उद्योगाने चांगलीच उसळी घेतली आहे. दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल या उद्योगामुळे होत असते. नागरिकांनी सध्या दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गाड्या विकत घेण्याची सुरुवात केल्यामुळे एजन्सीजना गाडी डिलिव्हरी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आजच्या दिवशी गाड्यांची डिलिव्हरी देण्यासाठी ऑटो एजन्सीजना मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागते. त्यातच बँकांनी लोन सहजरीत्या उपलब्ध करून दिल्याने ग्राहक वाहन खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.