महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना काळात देवीच्या मूर्तीसह गरबा मटक्यांची मागणी घटली, कुंभारांकडून मदतीचे आवाहन - goddess durga idol demand decrease thane

देशात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशासह राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे, नुकताच झालेल्या गणेशोत्सवात गणेश मूर्तींची मागणी घटल्याचे पहावयास मिळाले. दरवर्षीच्या तुलनेत केवळ २५ टक्केच ग्राहकांनी देवीच्या मूर्तींची नोंदणी केली. त्यामुळे, आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न मातीकामावर उपजीविका करणाऱ्या कुंभारांकडून विचारला जात आहे.

देवी मूर्ती
देवी मूर्ती

By

Published : Sep 20, 2020, 8:36 PM IST

ठाणे- गणेशोत्सव आणि दहीहंडी हे दोन्ही उत्सव कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यामुळे, यंदा मोठ्या प्रमाणात हंडी आणि गणेश मूर्त्या कुंभारांच्या दुकानात जशाच्या तशाच पडून राहिल्या. यामुळे कुंभार समाजाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता काही दिवसांवरच नवरात्री आहे. त्यावर कुंभार समाजाची आशा आहे. यातून उदरनिर्वाहाचा खर्च मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. मात्र, यंदा अपेक्षे पेक्षा कमी प्रमाणात ग्राहकांनी देवीच्या मूर्तींची नोंदणी केली आहे. त्यामुळे, हा सण देखील नुकसानीतच जाणार असून आता आम्ही जगायचे कसे, हा प्रश्न कुंभारांनी उपस्थित केला आहे.

माहिती देताना कुंभार बांधव

नवरात्री उत्सवासाठी कुंभारांनी देवीच्या मूर्त्या व विविध आकार व डिझाइनच्या गरबा मटक्या बनवल्या आहेत. मात्र, यंदा कोरोनामुळे कुंभार समाजाच्या व्यवसायावर आर्थिक संकट कोसळल्याने आता त्यांनी शासनाकडे आर्थिक मदतची मागणी केली आहे. साडेतीनशे वर्षाचा इतिहास असलेल्या कल्याण येथील गुजराथी कुंभार आळीत वर्षभर विविध सणासाठी लागणारे मातीचे साहित्य तयार केले जाते. विशेष म्हणजे, येथे तयार होणाऱ्या मूर्त्या व साहित्य घाऊक व किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेऊन नोंदणी केली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशासह राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे, नुकताच झालेल्या गणेशोत्सवात गणेश मूर्तींची मागणी घटल्याचे पहावयास मिळाले. दरवर्षीच्या तुलनेत केवळ २५ टक्केच ग्राहकांनी देवीच्या मूर्तींची नोंदणी केली. त्यामुळे, आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न मातीकामावर उपजीविका करणाऱ्या कुंभारांकडून विचारला जात आहे. कोरोनामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून शासनानेच आता मदतीचा हात द्यावा, अशी मागणी कुंभारवाड्यातील विविध मूर्तिकारांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. आता शासन यावर काय निर्णय घेईल याकडे कुंभार समाजाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- गाडी मागे घेण्याच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण; कल्याणमधील प्रकार

ABOUT THE AUTHOR

...view details