ठाणे Durgadi Fort Fraud Case:आरोपी सुयश हा माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. बंटी-बबली या हिंदी चित्रपटात ताजमहल आपल्या नावाने करून बनावट कागदपत्राच्या आधारे विक्री करण्याचा प्रसंग या चित्रपटात दाखविण्यात आला. अशाच प्रकारे कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचे वंशज दाखूवन बनावट कागदपत्रांच्या आधारे ती जागा सुयश शिर्के याने स्वत:च्या नावे केली. मात्र, जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी असलेल्या प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला. घुडे यांनी २ नोव्हेंबर रोजी सुयश शिर्के (सातवाहन) यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( fort land in own name)
नाहरकत दाखल्यासाठी अर्जही केला :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयश शिर्के याने १२ सप्टेंबर २०२२ रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील ५ ते ७ कागदपत्रांवर शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले कागदपत्र अर्जसोबत जोडले होते. या जागेचं प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्यानं मंजुरीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आलं होतं.
पत्रव्यवहारातून भलतीच माहिती आली समोर :दरम्यानच्या काळात किल्ल्याची पडझड झाल्याने दुरुस्ती करावी म्हणून स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. किल्ल्या संदर्भात लेखी माहिती मागवली असता, ही जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी घ्यावी असा उल्लेख करत पोलिसांना कळविण्यात आले.