ठाणे Dumping Debris In Thane Creek : खाडीच्या किनारी असलेल्या खारेगाव टोल नाक्याजवळ सध्या मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात येत असल्यानं किनाऱ्यावर कचऱ्याच्या लाटा धडकताना दिसत आहेत. हे खासगी कंत्राटदारांचं काम नसून चक्क ठाणे महापालिका स्वतःचे नियम धाब्यावर बसवून हजारो डंपर कचरा इथं ओतत असल्यानं सामान्य नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
पर्यावरणाचे धडे देणारी महापालिका जर अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळू लागल्यानं पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इथं टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याबरोबर ठाणे शहर आणि अन्य भागातून मोठ्या प्रमाणात डेब्रिज आणून खाडी किनारी टाकलं जात आहे. या सगळ्या प्रकारामुळं खडकी नारी असलेल्या खारफुटीला प्रचंड धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं कचऱ्याचं डम्पिंग त्वरित थांबवावं, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
शहरात दररोज 90 हजार मेट्रिक टन कचरा : मुंबईचे जुळे शहर म्हणून ठाण्याची ओळख असून ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सध्या ठाण्याची लोकसंख्या 25 लाखांहून पुढे गेली असून या शहरात दररोज अंदाजे 90 हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नसल्यानं गेली 20 वर्षे कचरा कुठं टाकायचा असा यक्ष प्रश्न महापालिकेसमोर उपस्थित राहीला आहे. दिवा येथील खासगी जमिनीवर क्षमता संपल्यावर देखील गेली अनेक वर्ष महापालिकेतर्फे कचरा टाकण्यात येत होता. कचऱ्याला दररोज लागणाऱ्या आगीमुळे दूर आणि दुर्गंधीनं त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलनं छेडली. त्यामुळे शहरात निर्माण होणारा कचरा भंडारी इथं टाकण्यास महापालिकेनं सुरुवात केली. इथल्या नागरिकांनी देखील कचऱ्याविरोधात आंदोलन छेडल्यावर आता डायघर इथं कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे.