ठाणे : ठाणे जिल्ह्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीसह फळबागांचें प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून वातावरणीय झालेल्या बदलामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे मानवी जीवनावरच नाही तर फलोउत्पादन, शेती उत्पादनावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
उष्ण तापमानाचा फटका :अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर उष्ण तापमानाचा गेल्या दोन दिवसापासून ठाणे जिल्ह्यातील फळबागांना उन्हाची झळ लागून फळांचे प्रचंड नुकसान होत आहे. शहापूर तालुक्यातील दुर्गम परिसरात आलेल्या वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी उमेश धानके यांच्या आमराईतील आंब्यांच्या झाडावरील सर्वच आंबे उष्ण वातावरणामुळे गळून जमिनीवर पडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता हे झालेले नुकसान कसे भरून काढायचे असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.
आंब्याचे नुकसान :शहापूर तालुक्यातील उमेश धनके हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी आपल्या जागेत गेल्या दहा वर्षापूर्वी 300 आंब्याची झाडे लावली आहेत. यामधून त्यांना दरवर्षी सात ते आठ लाख रुपये इतके या अंब्यातून उत्पन्न होते. यावर्षी ही तितकेच उत्पन्न आपल्याला मिळेल या आशेत ते होते. मात्र गेल्या तीन दिवसांच्या वाढत्या तापमानामुळे आंब्यावरती मोठ्या परिणाम झाला आहे. आंबे झाडावरून गळून पडायला सुरुवात झाली असुन झाडाखाली आंब्यांचा खच पडला. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.