रस्त्या अभावी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यासह गावकऱ्यांचा प्रवास ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात आजही बहुतांश आदिवासी गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत, तसेच रस्त्यांअभावी अनेक रुग्ण दगावले आहेत. मात्र, याप्रश्नी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आदिवासी समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहापूर तालुक्यातील पिवळीपाडा-हेदूचापाडा या ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या गावकऱ्यांना रस्ताच नसल्याने जीव धोक्यात घालून विद्यार्थासह गावकऱ्यांना लाकडी पुलावरून प्रवास करावा लागत आहे.
अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सुमारे ६५ आदिवासी गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी सांगितले की, प्रशासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने रस्त्यांअभावी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यामुळे गेल्यावर्षी 14 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर शासनाच्या निषेधार्थ कामगार संघटनेच्यावतीने डोली मोर्चा काढण्यात आला होता.
रस्ता, वीजपुरवठ्यापासून नागरिक वंचित : एकीकडे देशभरात ७५ वा अमृत मोहत्सव साजरा होत आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी गावांना पाड्यावर जाण्यासाठी रस्ते नाहीत. ग्रामपंचायत सोली पाडा - हेदुचापाडा येथे जाण्यासाठी रस्ता नसून गावात अजूनही वीजपुरवठा नसल्याने ग्रामस्थांना मूलभूत सुविधांविना जगावे लागत आहे. या गावात 19 कुटुंबांची घरे आहेत. शिक्षणासाठी या गावातील 23 मुले-मुली रोज आपला जीव धोक्यात घालून नदीवर बाधंलेल्या लाकडी पुलावरुन प्रवास करीत आहेत.
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लाकडी पूल पुराच्या पाण्यात बुडाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे. आज ठाणे जिल्हा कातकरी उपप्रमुख मालू हुमणे, तालुका सचिव प्रकाश खोडका, तालुका युवा प्रमुख रुपेश अहेरे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली.