ठाणे - ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सूत्रधार मारेकऱ्यांच्या अटकेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डोंबिवली शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. भर पावसात आंदोलनकर्त्यांनी निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करा; ठाण्यात भर पावसात आंदोलन डॉ. दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला झाली 8 वर्षे पूर्ण
पश्चिम डोंबिवलीत रेल्वे स्टेशनजवळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आंदोलन केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला 8 वर्षे झाली. तरीही खरा सूत्रधार अजून मोकाट फिरत आहे. डॉ. दाभोलकर यांच्या नंतर अनेक समाज सुधारक व विचारवंतांचे मुडदे पडले आहेत. अश्या समाज सुधारक व्यक्तींना संरक्षण मिळावे यासाठी नवीन कायदा अंमलात आणावा, तसेच अशा इतर मागण्यांकरिता संविधनिक पद्धतीने शांततापूर्ण मुक निदर्शने केली.
कोरोना काळातील सर्व नियम पाळून निदर्शने -
विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची परवानगी घेऊन आणि कोरोना काळातील सर्व नियम पाळून निदर्शने केली. या आंदोलनात मअंनिसच्या राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, राज्याच्या कायदा विभागाच्या सहसचिव ऍड. तृप्ती पाटील, डोंबिवली शाखा विविध उपक्रम सचिव परेश काठे, मुकुंद देसाई, अशोक आहेर, शुभांगी कदम, संतोष पाटील, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.