ठाणे - डोंबिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तब्बल ३३ आरोपींनी पीडितेवर वारंवार सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज डोंबिवलीत आल्या होत्या. त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच पोलिसांची भेट घेऊन या प्रकरणाचा नेमका कुठपर्यंत तपास झाला? याची माहिती मिळवली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सामूहिक बलात्कारच्या घटनेत आरोपी अंमली पदार्थाचे सेवन करीत होते ते त्यांना कुठून मिळाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नीलम गोऱ्हे नेमके काय म्हणाल्या?
पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींच्या विरोधात चार्जशिट दाखल करावी. मुलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कसे करता येईल याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. पोलिसांनी फार थोड्या वेळात आरोपींना पकडले आहे. सर्व प्रकारची प्रक्रिया पोलिसांनी केली आहे. पीडीत मुलीची शिकण्याची इच्छा आहे. तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काय करता येईल, त्यासाठी तिच्या पालकांशी बोलणे झाले आहे. तिच्या कुटुंबाला मदत केली आहे”, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तर पीडितेचे वडील या प्रकरणामुळे कामावर जाऊ शकले नाहीत. त्यांना कामाच्या संदर्भात मदत केली जाईल. पोलीस चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारच्या मनोधैर्य योजनेतून पीडित कुटुंबाला येत्या पंधरा दिवसात मदत दिली जाईल”, असे आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी दिले.
‘आरोपींकडे अंमली पदार्थ कुठून आले’
पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ज्याबाबी पोलिसांसमोर येतील त्याप्रमाणे पोलीस कारवाई करतील, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच सामूहिक बलात्काराच्या घटनेत आरोपी अंमली पदार्थाचे सेवन करीत होते. ते त्यांना कुठून मिळाले. त्याचा तपास पोलीस करत आहेत, असे देखील निलम गोऱ्हे यांनी सांगितले.