ठाणे- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकलमध्ये आता सरसकट सर्व महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट घरासमोर शेकडो महिलांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर महिलांना प्रवास करता येणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी राज्यसरकारने पहिले पत्र रेल्वेला पाठवले होत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत नसलेल्या महिलांना देखील लोकलमध्ये प्रवासाची मुभा द्यावी, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यावर लगेच रेल्वेने उत्तर पाठवत एकूण किती महिला प्रवासी असतील आणि गर्दी होऊ नये, यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबावी याची माहिती राज्य सरकारकडून मागितली होती.