ठाणे- खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीच्या माध्यमातून डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलातील क्रिकेट खेळपट्टीचे लोकार्पण करण्यात आले होते. लोकार्पण सोहळा मोठा गवगवा करीत 3 मार्च रोजी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. जवळपास 50 लाख रुपयांचा निधी खर्च करून उभारलेल्या या क्रिकेट खेळपट्टीवर 5 महिन्यात कंबरेभर गवत उभे आहे. त्यामुळे उदयोन्मुख क्रिकेटपटूंकडून शिवसेना युवराजासह स्थानिक सेना नेत्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
क्रिकेट खेळपट्टीची 5 महिन्यातच दुरवस्था विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना भाजपने उदघाटन, भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यासह यात्रा काढण्याचा धडाका लावला आहे. त्यातच डोंबिवली कल्याण परिसरात बुधवारी दुपारी आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा दाखल होणार आहे. आता या यात्रेच्या माध्यमातून शहरात पडलेल्या खड्डेमय रस्त्यांशी त्यांचा सामना होणार आहे. त्यासोबतच क्रिकेटपटूंना सरावासाठी उभारण्यात आलेल्या चारही खेळपट्ट्यांची दुरवस्था झाल्याने बंद अवस्थेत आहे. कल्याण व डोंबिवली परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटू आदित्य ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही अवस्था मांडणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कल्याण व डोंबिवली परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सरावासाठी उत्तम सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ठाणे व मुंबईपर्यंत जावे लागते. क्रिकेटचे मोठे किट घेऊन लोकलने प्रवास करणे जिकिरीचे आहे. त्यामुळे उदयोन्मुख क्रिकेटपटूंची गैरसोय दूर करण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी खासदार निधीतून ४५ लाख रुपयाचा निधी मंजूर केला. त्यानंतर डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलात चार खेळपट्ट्या विकसित केल्या. येथील क्रिकेट सराव खेळपट्टीचे उद्घाटन केल्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी फलंदाजी देखील केली. यावेळी विकेट कीपर म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तर स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी गोलंदाजी केली. विशेष म्हणजे कल्याणचा जागतिक विक्रमवीर प्रणव धनावडे हाही या लोकार्पण सोहळ्याला हजर होता. त्यावेळी त्यांनीही या कामाचे तोंडभरून कैतुक केले होते. प्रणवशी ईटीव्ही भारत ने संपर्क करण्याच्या प्रयत्न केला असता तो मुंबईत सरावासाठी गेला असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. तसेच गेल्याच आठवड्यात प्रवण या ठिकाणी गेला. मात्र येथील दुरवस्था पाहून त्याने नाराजी व्यक्त केल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
या खेळपट्टीवर कपिल देव, सचिन तेंडुलकर, अजरुद्दीन, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी, निलेश कुलकर्णी यांसारख्या अनेक प्रसिद्ध खेळांडूचे फोटो आणि त्यांची माहिती लावल्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या नगरसेवक विकास निधीतून ही धावपट्टी तयार करण्यात आली आहे. मात्र पाच महिन्यात गाजावाजा करून उभारण्यात आलेल्या या सराव पट्टीवर कंबरेभर गवत तयार झाले आहे. तसेच कपिल देव, सचिन तेंडुलकर आणि अजरुद्दीन या प्रसिद्ध खेळांडूचे फोटो आणि त्यांची माहिती असलेल्या फलकासमोरच गवत उभे राहिल्याने तेही गवताआड गेले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी उभारण्यात आलेल्या सरावाच्या ठिकाणी भेट देतील काय? असा सवाल सरावापासून वंचित असलेले उदयोन्मुख क्रिकेटपटू करत आहे.