ठाणे -दिव्या उमाशंकर यादव ही एक वर्षाची चिमुकली पाण्याच्या बादलीत पडून बेशुद्ध झाली होती. तिच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तत्काळ उपचार करून तिचे प्राण वाचवण्यास बालरोग विभागाच्या डॉक्टरांना यश मिळाले आहे.
मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) ठाण्यातील वाघोबा नगर, कळवा येथील चाळीत राहणारे दिव्या उमाशंकर यादव ही चिमुकली खेळत असताना पाण्याचा बादलीत पडली. तिच्या नाकातोंडात पाणी जाऊन ती बेशुद्ध झाली. तिच्या आई-वडिलांनी तिला खासगी रुग्णालयात नेले असता रुग्णालयाने दाखल करण्यास नकार देत तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यास सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बाळाला आणताच बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाला तपासून तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले. भरती करताना बाळ बेशुद्धावस्थेत होते. तिचे शरीर थंड पडले होते. बाळाला आकडी येऊन रक्तदाबही कमी झाला होता.