ठाणे: अपहरकर्त्यांनी गुन्हा करताना कुठलाही पुरावा सोडला नव्हता. शिवाय फिर्यादी डॉक्टरकडून देखील कोणतेही धागेदोरे मिळाले नव्हते. पोलिसांनी डॉक्टरच्या कामाचे स्वरूप, वर्तन, इतर वैयक्तिक बाबी आणि तांत्रिक माहितीचा सूक्ष्म अभ्यास करून पुरावे गोळा केले. त्यानंतर आरोपींचे टावर लोकेशन मिळवून त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित केला. पोलिसांनी २० एप्रिल रोजी ३ आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याआधारे त्यांना अटक केली. सदर गुन्ह्यात जलद तपास करून आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.
असा रचला कट:मुरबाड बस डेपो समोर डॉ. जितेंद्र भेंडारी यांचे तन्मय नावाने रुग्णालय आहे. डॉ. भेंडारी हे २१ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी मुरबाड शासकीय विश्रामगृहासमोर त्यांना एका अज्ञात व्यक्तीने आवाज देत त्यांची दुचाकी थांबवली. ती व्यक्ती सजाई जायचे असल्याचे सांगून डॉक्टरांच्या दुचाकीवर बसली. काही अंतरावर अंधारात एक चारचाकी वाहन उभे असल्याचे पाहून त्या व्यक्तीने डॉ. भेंडारींना दुचाकी थांबवण्यास सांगितले. पुढे त्या अज्ञात व्यक्तीने साथीदारांच्या मदतीने डॉ. भेंडारी यांना उचलून चारचाकी वाहनात कोंबत जंगलात पळ काढला.
अपहरणाचा फिल्मी स्टाईल थरार:अपहरणकर्त्यांनी डॉक्टरला मारहाण करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि 30 लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. अपहरणकर्त्यांनी डॉक्टरच्या पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला आणि ३० लाख रुपये आम्ही सांगू त्या ठिकाणी घेऊन ये. अन्यथा पती जिवंत राहणार नाही, असे धमकावले. शेवटी पत्नीने ३० लाख रोख रक्कम सांगितलेल्या ठिकाणी पोहोचती केल्यानंतर अपहरकर्त्यांनी डॉ. भेंडारींची सुटका केली; मात्र पळ काढताना पीडित डॉक्टरच्या कुटुंबाला पोलिसांकडे गेल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.