ठाणे -कल्याणमध्ये राहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीला लहानपणापासून डोक्यावरची केस खाण्याची सवय लागली होती. हीच सवय तिच्या जीवावर बेतण्याआधीच त्या मुलीवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तब्बल ६५० ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा काढण्याने तिचा जीव बचावला आहे.
दोन वर्षांची असताना जडली सवय -
कल्याण शहरात मुलीचे कुटूंब राहत आहे. या मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच केस खाण्याची सवय जडली होती. विशेष म्हणजे मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सुटावी म्हणून खूप प्रयत्न केले. परंतु ती सवय सुटली नाही. गेल्या आठवड्यात अचानक मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे कल्याणातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल करण्यात आले.
सिटीस्कॅन केल्यानंतर प्रकार आला समोर -
रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचे वजन केवळ २० किलो होते. त्यांनतर डॉक्टरांनी तिच्या पोटाचा सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस अडकले असल्याचे दिसून आले. शिवाय मागील गेल्या दोन महिन्यापासून तिला जेवणदेखील जात नव्हते. अखेर हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी ओपन सर्जरीचा मार्ग निवडला -
डॉक्टरांनी सांगितले की, मुलीच्या पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कॉपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की, हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कॉपीक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती. म्हणूनच ओपन सर्जरीचा मार्ग निवडला गेला आणि भला मोठा केसाचा गोळा मुलीच्या पोटातून काढण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याने तिचा जीव वाचला.
हेही वाचा - अफगाणिस्तानात भारताने केली आहे ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, आता तालिबानी मांडताहेत उच्छाद