महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीतील दर्गा दिवानशाह मालमत्तेचा अपहार; विश्वस्त मंडळ बरखास्त करून महाराष्ट्र वक्फचा ताबा - दर्गा दिवानशाह विश्वस्त मंडळ भिवंडी भ्रष्टाचार

महाराष्ट्र वक्फ मंडळाने (Maharashtra Waqf Board) दर्गा दिवानशाह विश्वस्त मंडळ बरखास्त (Diwanshah Dargah trust) करून सदर विश्वस्त संस्था स्वतः च्या ताब्यात घेतली आहे. दर्गा दिवानशाह विश्वस्त संस्थेच्या मालमतेत मागील कित्येक वर्षे आर्थिक भ्रष्टाचार व जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

Diwanshah Dargah
दर्गा दिवानशाह

By

Published : Feb 17, 2022, 5:41 PM IST

Updated : Feb 17, 2022, 10:44 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील सर्वात जुन्या व शहराची ओळख म्हणून उल्लेखिलेल्या दर्गा दिवानशाह विश्वस्त संस्थेच्या (Diwanshah Dargah trust) मालमतेत मागील कित्येक वर्षे आर्थिक भ्रष्टाचार व जमिनीवर अतिक्रमण झाली. मात्र, विश्वस्त मंडळ कोणतीही कारवाई करत नसल्याने अखेर महाराष्ट्र वक्फ मंडळाने (Maharashtra Waqf Board) दर्गा दिवानशाह विश्वस्त मंडळ बरखास्त करून सदर विश्वस्त संस्था स्वतः च्या ताब्यात घेतली आहे.

प्रतिक्रिया देताना वक्फ बोर्डाचे अधिकारी

अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले -

महाराष्ट्र वक्फ मंडळाचे सदस्य डॉ. मुद्दसिर लांबे व कोकण विभागीय प्रादेशिक वक्फ मंडळ अधिकारी अब्दुल जफार शेख बुधवारी सायंकाळी भिवंडीत दाखल झाले. त्यानंतर दर्गा दिवानशाह विश्वस्त मंडळाच्या कार्यालयाचा ताबा घेत सर्व व्यवहार ताब्यात घेतले आहेत. या निर्णयाचे भिवंडी शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून, दर्गा दिवानशाहच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र वक्फ मंडळाकडे तक्रार -

दर्गा दिवानशाह या विश्वस्त संस्थेचे परंपरागत विश्वस्त असद अली खान हे हैद्राबाद येथे वास्तव्यास असून तर दुसरे विश्वस्त खालिद अस्लम सय्यद हे दर्गा परिसरात वास्तव्यास आहेत. दर्गा दिवानशाहच्या मालकीची भिवंडी शहर परिसरात तब्बल 57 एकर जमीन असून या जमिनीवर अनेक राजकीय व्यक्तींकडून अतिक्रमण करण्यात आले असून आज ही मोठ्या प्रमाणावर अनेक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. तर दर्गाच्या दानपेटीत जमा होणाऱ्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार केला जात असल्याचा आरोप करीत जाहिद मुख्तार शेख यांनी महाराष्ट्र वक्फ मंडळाकडे तक्रार करीत विश्वस्त मंडळ हे अकरा सदस्यांचे नसल्याने ते मनमानी करीत असल्याने ते बरखास्त करावे अशी मागणी केली होती.

अनेक गैरव्यवहार व आर्थिक अफरातफर -

जाहिद मुख्तार शेख यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सुनावणी घेतली असता दर्गा दिवानशाह अनेक गैरव्यवहार व आर्थिक अफरातफर झाल्याचे निष्कर्ष नोंदवीत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेत, या आदेशाची अंमलबजावणी केली असून कोकण विभागीय प्रादेशिक वक्फ मंडळ अधिकारी अब्दुल जफार शेख यांच्या नियंत्रणाखाली दर्गा दिवानशाह विश्वस्त संस्थेचा कारभार येणार आहे. तसेच लवकरच नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल अशी महिती महाराष्ट्र वक्फ मंडळाचे सदस्य डॉ. मुद्दसीर लांबे यांनी दिली आहे.

Last Updated : Feb 17, 2022, 10:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details