माहिती देताना कारागीर ओंकार फडके ठाणे Diwali Festival २०२३ : दिवाळीत बच्चे कंपनी घराच्या अंगणात दगड- मातीचे किल्ले बांधायचे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांच्या मूर्ती ठेवून सजवण्याचा उत्साह असायचा. वर्षानुवर्षे अशा पद्धतीनं दिवाळी साजरी करायचे. मात्र, गेल्या काही वर्षात बच्चे कंपनीला दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये देखील स्पर्धात्मक अभ्यासाचे वाढलेले ओझे आणि मोबाइल इंटरनेटच्या व्यापातून मुले घराबाहेर देखील पडत नाहीत. मातीचे किल्ले तयार करणे हे इतिहासजमा होऊ लागले आहे. यामुळे मातीच्या किल्ल्यांची जागा 'पीओपी'च्या किल्लांनी (Pop Forts) आणि मावळ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
मातीच्या किल्ल्यांची जागा घेतली पीओपीने :दिवाळीचा फराळ, दिवे, कंदील, सजावटीबरोबरच घराबाहेर अंगणात लहान मुलांकडून दगड-मातीचे गड, किल्ले बांधून घेतले जात होते. मुलांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी किल्ले बांधणी स्पर्धेचे देखील आयोजन केले जात होते. तर परीक्षा संपताच यंदा आपण कोणता किल्ला बांधायचा? याचा शोध मुलांकडून सुरू होत होता. किल्ल्याचा इतिहास सांगणारी पुस्तके शोधण्यासाठी मुलांची वाचनालयात गर्दी होत होती. मात्र, आता इंटरनेटवर किल्ल्याची माहितीच नव्हे तर किल्ला कसा बांधावा याची संपूर्ण माहिती मिळते. मात्र, मुलांना मातीत खेळण्यास, तसेच मातीत काम करू देण्यास पालक देखील तयार होत नाहीत. मुलांना देखील मातीत काम करणे फारसे आवडत नसल्याचं दिसत आहे. तर किल्ल्यासाठी लागणारी माती देखील सहज उपलब्ध होत नसल्याने मातीच्या किल्ल्याची जागा पीओपीच्या किल्ल्यांनी घेतली आहे.
पीओपी मावळ्यांच्या किंमतीत वाढ : किल्ल्यांवर सजवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे देखील पीओपीपासूनच तयार केले जात आहेत. जिल्ह्यातील अनेक गणपती कारखान्यात गणेशोत्सव संपताच मावळे, किल्ले बनवण्याचे काम सुरू झाले आहे. होलसेल दरात विक्रेत्यांकडून या किल्ल्यांची आणि मावळ्यांची खरेदी केली जाते. विशेष म्हणजे, किल्ल्यांची मागणी देखील हळूहळू कमी होऊ लागली आहे. दरवर्षी ग्राहकांची संख्या कमी होत असल्याचं कारागिरांचं म्हणणं आहे. त्यातच वाढलेली मजुरी, पीओपीच्या वाढलेली किंमती, वाहतुकीचा वाढता खर्च यामुळे किल्ल्यांच्या आणि मावळ्यांच्या किंमती देखील वाढल्या आहेत.
बाजारात किल्ले विक्रीसाठी उपलब्ध : महागाईचा फटका बच्चे कंपनींच्या किल्ल्यांना बसला आहे. ५०० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या आकारातील किल्ले विक्रीसाठी उपलब्ध असले तरी, हे किल्ले काल्पनिक आहेत. तर किल्ल्यांच्या रक्षणासाठी २५० ते ४०० रुपयापर्यंत मावळे विकले जातात. २५ ते ५० रुपयाने एक मावळा विकला जात आहे. मागील वर्षी हेच मावळे १५ ते ३० रुपयांपर्यंत मिळत होते. मात्र, यात प्रत्येकी १० रुपयांची वाढ झाल्याचे ओंकार फडके यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Diwali Festival २०२३ : पणती व्यवसायाला उतरती कळा; ऐन दिवाळीत पणतीच्या भट्ट्या बंद
- Tuberculosis Test : मिठाईच्या दुकानात कर्मचाऱ्यांची होणार क्षयरोगाची चाचणी; अभिनव संकल्पनेला ठाण्यातून सुरुवात
- Diwali Festival २०२३ : सणासुदीत गृहिणींचं बजेट कोलमडणार; डाळी व कडधान्यांच्या भावात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी वाढ