ठाणे : राज्यातील सरकारमधील शिंदे-गट आणि भाजपमध्ये युती फुटीची धगधग सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघात युतीमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याची चर्चा माध्यमांमध्ये होऊ लागली आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी राजीमाना देण्याचा इशारा दिला आहे. डोंबिवलीमधील भाजप नेत्यांकडून शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
भ्रष्टाचार करणाऱ्या शिवसेनेशी युती: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल दिव्यात विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. पण दिव्याच्या विकासासाठी आलेल्या निधीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद कायम आहे. राज्यात शिवसेना भाजप युती असल्याने दिव्याच्या विकासासाठी आलेला निधी हा युतीच्या माध्यमातून निधी आला आहे. पण निधी आणण्याचे श्रेय केवळ शिवसेना घेत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. एकट्याने श्रेय घेणाऱ्या तसेच दिव्यात विविध प्रकारचा भ्रष्टाचार करणाऱ्या शिवसेनेशी युती, नकोच अशी ठाम भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. या एकला चलो रे च्या भूमिकेमुळे राज्यात एकीकडे युतीचे वारे वाहत असताना ठाणे महापालिका क्षेत्रातील आणि मुख्यमंत्र्याचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात येणाऱ्या दिवा भागात मात्र येत्या काही दिवसांत शिवसेना विरुद्ध भाजप, असा संघर्ष पहायला मिळणार आहे.
श्रेयवादावरुन भाजप-शिंदे गटात वाद: एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमानातून विविध प्रकारची विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये पुरातत्व खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरणाचे भुमिपूजन, आगरी कोळी वारकरी भवन भूमीपूजन, दिवा शहरातील धर्मवीर नगर, दिवा आगासन रोड दिवा येथे दिवा शहरातील नवीन मुख्य जलवाहिनी, दिवा आगासन मुख्य रस्ता, आरोग्य केंद्र, दातिवली गाव येथे व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गाव येथील शाळा ,आगासन देसाई खाडी पुल, सामाजिक भवन, दातिवली तलाव सुशोभिकरण, दिवा शीळ रोड, देसाई गाव तलावा भूमीपूजन अशा अनेक कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाले. मात्र या सर्व विकासकांमाचे श्रेय केवळ शिवसेना घेत असल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.
राज्यात युती असली तरी दिव्यात मात्र शिवसेनेकडून युती संदर्भात कोणत्याही प्रकारचा समन्वय साधला जात नसल्याचा आरोप भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून दिव्याच्या विकासाठी 800 कोटींचा निधी आणला असल्याचे आम्ही ऐकत आहोत. मग दिवा एवढा बकाल का? हा निधी गेला कुठे असे अनेक प्रश्न उपस्थित करत दिव्यात गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना भाजपमध्ये युती नव्हती, भाजप दिव्यात स्वयंभू असल्याचे सांगत दिव्यात आम्हाला युती नकोच आहे ही आमची भूमिका आहे.- रोहिदास मुंडे, दिवा शहर अध्यक्ष भाजप.
बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो नाहीत : दिव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र यासाठी ठिक-ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर केवळ शिवसेना पदाधिकाऱ्यांची नावे असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे वगळण्यात आली असल्याचा आरोप देखील रोहिदास मुंडे यांनी केला आहे. दिव्यातील स्थानिक नेत्यांचा फोटो लावला नाही तरी चालेल मात्र जर राज्यात युती आहे तर भाजपचा मोठ्या नेत्यांचा फोटो का लावण्यात आला नाही असा प्रश्न देखील मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर भाजपने केलेल्या आरोपांविषयी स्थानिक शिवसेना नेते आणि माजी नगरसेवकांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले आहे. यावरून शिवसेना ही भाजपला सोबत घेण्यासाठी उत्सुक नाही हे दिसून येत आहे.
श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा : डोंबिवलीतही शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला आहे. वादामुळे श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान येथील भाजप पदाधिकाऱ्यावर त्याच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीकडे शरीरसुखाची केल्याचा आरोप आहे. याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण यामागे शिवसेनेतील शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यावरुन त्यांनी डोंबिवलीत मोर्चा काढला होता. यापुढे शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. याच कारणामुळे संतापलेल्या श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न : शिवसेना-भाजपच्या युतीत क्षुल्लक कारणांसाठी मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू असल्याचा आरोपही श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील जनतेचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. पण काही क्षुल्लक कारणांसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण काही स्थानिक नेत्यांकडून केले जात आहे.
खासदारकीचा वाद : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष मोर्चबांधणी करू लागले आहेत. याच दरम्यान वेगवेगळ्या मतदारसंघात आपल्या जागेचा दावा ठोकत आहेत. अशात शिंदे गट आणि भाजपमध्ये जागेवरुन वाद निर्माण होऊ लागला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेच्या जागेवर भाजप नेत्याकडून दावा ठोकण्यात येत आहे. कल्याणमध्ये भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल, अशी ठाम भूमिका स्थानिक भाजपने घेतली आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू. केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदुखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याची तयार आहे. - श्रीकांत शिंदे खासदार, शिंदे गट शिवसेना.
हेही वाचा -
- MP Shrikant Shinde On Sanjay Raut: संजय राऊतांना लोक जागा दाखवतील- खासदार श्रीकांत शिंदे
- MP Shrikant Shinde on MHADA : म्हाडा लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ करण्यावर शिक्कामोर्तब; खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती