ठाणे - एका कोरोनाबाधित रुग्णाला उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून झालेली चूक लक्षात येताच, त्या रुग्णाच्या घरी जाऊन त्याला ५ तासानंतर पुन्हा रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.
उल्हासनगर महापालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉल परिसरात राहणारा असून, कोरोनाबाधित आढळून आल्याने त्याला उल्हासनगर ४ नंबर येथील महापालिकेच्या कोविड- १९ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २९ एप्रिलला या रुग्णाची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर २ मे रोजीही दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, ४ मे रोजी पुन्हा कोरोना चाचणीसाठी पाठवलेला अहवाल प्रलंबित असल्याने हा रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या वार्डमधून वांरवार बाहेर फिरताना दिसत असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
सुधाकर देशमुख, महापालिका आयुक्त, उल्हासनगर रुग्ण घरी सोडण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांकडे तगादा लावला होता. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला ७ मे रोजी डिस्चार्ज देऊन रुग्णवाहिकेमधून घरी सोडण्यात आले होते. तर रुग्ण राहत असलेल्या इमारतीमध्ये १४ रहिवाशी होम क्वारंटाईन होते. त्यातच रुग्ण निगेटिव्ह म्हणून घरी सोडले होते. त्यावेळी रहिवाशांनी त्यांना ओवाळून आणि टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले होते.
दरम्यान, ७ मे रोजी रुग्णाला घरी सोडून ५ तास झाल्यावर त्याचे ४ मे रोजी पाठवलेले स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्याच वेळी हा रुग्ण घरी नातेवाईकांसोबत आनंदात बसला असता रुग्णालयातील कर्मचारी पुन्हा रुग्णवाहिका घेऊन त्याच्या सोसायटीच्या दारात उभी केली. आरोग्य कर्मचारी पीपीई कीटसह तयारीत येऊन या रुग्णाला पुन्हा रुग्णवाहिकेतून घेऊन गेले. तर दुसरीकडे या अचानक घडलेल्या घटनेमुळे बरा होऊन घरी सोडलेल्या रुग्णासह नातेवाईकांना धक्काच बसला होता.
एकंदरीतच या घटनेमुळे निगेटिव्ह रिपोर्टची गडबड की चुकून डिस्चार्ज? असा प्रश्न उपस्थित झाला असून रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा होता का? अन्य काही त्रुटी होत्या. यामुळे या गंभीर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रुग्ण राहत असलेल्या परिसरात राहणारे जागृत नागरिक उदय रसाळ यांनी केली आहे.