ठाणे- जीवघेण्या आपत्तींमध्ये फसलेल्या लोकांना वेळीच मदत पुरविण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती केली आहे. या आपत्ती व्यवस्थापन केंद्राची शहरालगत असलेल्या सर्वच भागांना मदत होत आहे. या केंद्रामुळे नैसर्गिक व जीवघेण्या आपत्तींपासून लोकांचे संरक्षण करण्याच्या कार्याला वेग आला आहे.
ठाणे शहरात इमारती कोसळण्याच्या घटना अनेक दशकांपासून होत आहेत. यात आतापर्यंत शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. तर आग लागण्याच्या घटनांच्या सपाट्यात अग्निशामक दलातील कर्मचारीही सापडले आहेत. अशा दुर्घटनांमुळे ठाणे महानगरपालिकेने स्वतःचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार केला आहे. कोणतीही दुर्घटना असो तिची माहिती आधी व्यवस्थापन केंद्रात जाते व त्यानंतर संबंधित ठिकाणी कार्यवाही होते. शहरालगतच्या भिवंडी, मुंबई, कल्याण डोंबिवली उल्हासनगर, मीरा, भाईंदर, वसई या शहरांनासुद्धा ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष नेहमीच मदत होते. व्यवस्थापन कक्षाची आणखी एक मोठी जबाबदारी असते, ती म्हणजे समन्वयाची. इतर यंत्रणांबरोबर समन्वय ठेवण्याचे कामसुद्धा येथे अविरतपणे सुरू असते.