ठाणे- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, तसेच तत्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यामध्ये आजपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याची घोषणा केली आहे.
ठाणे जिल्हा मुंबई शहरालगत असल्यामुळे अनेक पर्यटक ठाणेमार्गे प्रवास करतात. तसेच मुंबईत कामाला असलेले अनेजण ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंचा फैलाव होऊ नये, म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे जाहीर केले आहे.
या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक विभाग तसेच सेवाभावी संस्था यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून दैनंदिन अहवाल सादर करायाचा आहे.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे. तसेच स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे, जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे आदी कामे केली जाणार असून हा कायदा लागू केल्यामुळे आता आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. खासगी रुग्णालयांनी सहकार्य करीत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत. मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तत्काळ कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत.