ठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास चित्रपट दिग्दर्शक विजू माने नाट्यगृहाच्या लिफ्टमध्ये १० ते १५ मिनिटे अडकल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित बाब सुरक्षाकर्मींच्या लक्षात येताच त्यांनी माने यांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना कसेबसे लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढले. मात्र, या गंभीर प्रकरणी दिग्दर्शक विजू माने यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या लिफ्टमध्ये अडकले दिग्दर्शक विजू माने
कोणत्या ना कोणत्या गोष्टीत नेहमीच चर्चेत असलेल्या ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह हे आज एका वेगळ्याच बाबतीमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी सकाळी आनंद विश्व गुरूकुल आणि महाविद्यालयाच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक विजू माने कार्यक्रमाला जात असताना काशिनाथ नाट्यगृहाच्या व्हीआयपी लिफ्टमध्ये अडकले. यावेळी अचानक झालेल्या या प्रकरणामुळे माने यांना धडकी भरली. त्यांनी आरडाओरडा केला असता बऱ्याच वेळानंतर नाट्यगृहाच्या सुरक्षाकर्मींनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. हा प्रकार एवढा गंभीर असून मी थोडक्यात बचावलो असल्याचे यावेळी माने यांनी सांगितले.
हेही वाचा - ठाण्यातील मेट्रोसाठीच्या वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची व्हीआयपी लिफ्ट मुळातच गेल्या अनेक महिन्यांपासून खराब असून असे प्रकार अनेकवेळा घडल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे नाट्यगृहात येणाऱ्या एखाद्या व्हिआयपी किंवा सामान्य प्रेक्षकाचा जीव गेल्यावर ठाणे महानगरपालिका जागी होणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. खरेतर ठाण्यातील नाट्यगृहांवर ठाणे मनपा कोट्यावधी रुपये खर्च करत असते. मात्र, तरीही अशा घटना घडतात. त्यामुळे पालिका प्रशासन नाट्यगृहाबाबत किती गंभीर आहेत? हे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यापूर्वीच अभिनेता सुमित राघवनने नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल ठाणे मनपाचे सोशल मीडियावर वाभाडे काढले होते. त्यानंतर झालेला हा प्रकार गंभीर असून पालिका प्रशासनाला कधी जाग येणार? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, नाट्यगृह आणि दुरवस्था ही युती कधीच तुटणार नसून आज माझ्यावर हा जीवघेणा प्रसंग घडला आहे. मात्र, उद्या हा प्रसंग दुसऱ्या कोणावर उद्भवला तर, काय होईल सांगता येत नाही, असा सवाल करून सोशल मीडियावर पोस्ट टाकत मानेंनी ठाणे महापालिका आणि प्रशासनाचे वाभाडे काढले. घडलेल्या प्रकरणानंतर माने यांनी त्वरित पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना संदेश पाठवला. तर, आयुक्तांनी मी रजेवर असल्याचे सांगत रूजू झाल्यानंतर त्वरित यावर लक्ष देईन, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे माने यांनी सांगितले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन असो किंवा डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह असो असे प्रकार नेहमीच घडत असतात. तर, वारंवार तक्रार करून देखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. घडलेल्या या प्रकरणानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी त्वरित बैठक बोलावून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मात्र, 'तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो', असा मेलोड्रामा मुख्यालयात रंगल्याने याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
हेही वाचा -भिवंडी महापौर निवडणूक : कोणार्क आघाडीच्या सौदेबाजीमुळे काँग्रेसमध्ये फूट, तर भाजपही दावणीला!