ठाणे - कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. केडीएमसी प्रशासनानुसार महापालिका हद्दीत आजपर्यंत १ हजार ६३९ कोरोनाबाधितांचा आकडा आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत कल्याण डोंबिवली महापालीका हद्दीत २ हजार ८२ रुग्ण असल्याचे दाखविण्यात आले असून दोघांची आकडेवारी पाहता तब्ब्ल ४४३ रुग्णांची तफावत असल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या ३६ सांगितली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या बुधवारी जाहीर केलेल्या यादीत एकूण ५० कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे नक्की महापालिकाहद्दीत आतापर्यंत किती रुग्ण आढळून आले आणि किती रुग्णांचा मृत्यू झाला, यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
कल्याण डोंबीवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दरदिवशी आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. बुधवारी (१० जून) महापालिका हद्दीत ७७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
बुधवारच्या कोरोनाबाधितांच्या यादीत ८ अल्पवयीन मुलामुलींचा समावेश आहे. तर रुग्णांची विगतवारी पाहता कल्याण पूर्वेत २२, कल्याण पश्चिमेत २३ , आंबिवली व जेतवननगर परीसरात ६ तर डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेत २६ असे ७७ नवे रुग्ण आढळून आले.
यामधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. केडीएमसी प्रशासनाने दिलेली आकडेवारी आणि राज्यसरकारने दिलेली आकडेवारीमध्ये तफावत असल्यामुळे नेमकी कोणाची आकडेवारी गृहीत धरावी, असा प्रश्न कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना पडला आहे.