ठाणे : नितीन देसाई अर्थात 'एनडी' यांनी आपल्या खासगी कंपनीमार्फत ठाण्यात अनेक प्रकल्प हाती घेतले होते. त्यात प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका हद्दीत 'नवीन ठाणे जुने ठाणे' तसेच 'बॉलीवूड पार्क' आदींचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये त्यांना अपयश आले. परंतु या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न खूप गाजला आजही त्या कामातील गैरव्यवहारांची चौकशी सुरू आहे. पालिकेचे अभियंते रोहित गुप्ता यांनी ही माहिती आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे बडे अधिकारी आणि मोठ्या राजकीय नेत्यांच्या संगनमताने उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. काही नगरसेवकांनी 'एनडी'कंपनीचे बिल रोखवण्यात यावे अशी मागणी करून देसाई यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती, असे सांगितले जाते. या सर्व घटनाक्रमामुळेच नितीन देसाई कर्जबाजारी झाल्याने त्यांचा 'सुरज परमार' झाला अशी जोरदार चर्चा सध्या ठाण्यात सुरू झाली आहे. परमार ठाण्यातील मोठे बिल्डर होते. त्यांनीही आत्महत्या केली होती, आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी काही नगरसेवकांसह नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता.
ठाणे हे ऐतिहासिक शहर असून त्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ठाणे महापालिकेने घोडबंदर रोडवर 16 कोटी हून अधिक रक्कम खर्च करून 'जुने ठाणे-नवे ठाणे' हे थीम पार्क उभारले होते व त्याचे काम निष्णात कलादिग्दर्शक असलेल्या नितीन देसाई यांना देण्यात आले होते. ठाण्याचा इतिहास आबालवृद्धांपर्यंत सर्वांना कळावा यासाठी येथील पार्कची उभारणी करण्यात आली होती.
या थीम पार्कमध्ये ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर, मासुंदा तलाव, ठाण्याचे ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृह, मासुंदा तलावावरील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, गडकरी रंगायतन, ठाणे स्थानकावरून मुंबई ते ठाणे धावलेली पहिली रेल्वे, जुने ठाणे बंदर, गणपती विसर्जन घाट तसेच जुने ठाणे आरमार अशा देदीप्यमान इतिहासाच्या आठवणी जागृत करणाऱ्या प्रतिकृती निर्माण केल्या आहेत.