नवी मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘कोकणचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेला देवगडचा हापूस आंबा दाखल झाला आहे. ९ हजार रुपयांपासून ते ११ हजार रुपये इतका बाजारभाव आंब्याच्या एका पेटीला मिळाला आहे. तसेच या आंब्यांची खरेदी करण्यासाठी व्यापारी वर्गातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
देवगड हापूस वाशीच्या घाऊक बाजारात दाखल, एका पेटीला जवळपास ११ हजार रुपये भाव यंदा हापूस आंबा बाजारात दरवर्षीच्या तुलनेत उशिरा दाखल झाला आहे. देवगडमधील शेतकऱ्यांनी एपीएमसी बाजारातील आंबा विक्रेते संजय पानसरे यांच्याकडे विक्रीसाठी हा आंबा पाठवला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत आंब्याचा हंगाम 2 महिने उशिरा सुरू झाला आहे. यंदा आंबे हे बाजारात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात येतील व 15 एप्रिलच्या सुमारास आंबे बाजारात मोठ्या प्रमाणात दिसतील. अवकाळी पावसाचा फटका हा आंबा पिकाला बसला आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत आंब्याला अधिक बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे, असे फळ व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.
एका पेटीत पाच डझन आंबे असून या आंब्याच्या खरेदीसाठी ग्राहक वर्गातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबरमध्ये हापूस या जातीच्या मलावी या साऊथ आफ्रिकेतील आंब्याची चव ग्राहकांना चाखायला मिळाली होती. मात्र, तरीही ग्राहक वर्ग कोकणातील देवगड हापूसचा वाट पाहत होता. अखेर हा आंबा वाशीच्या घाऊक बाजारात दाखल झाल्याने ग्राहकात आनंदाचे पाहायला मिळाले.