ठाणे : गेल्या काही काळापासून देशाच्या अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे या दुदैवी घटनेमुळे ठाणे ग्रामीण आरोग्य यंत्रणा कार्यरत असून गावकऱ्याची नियमित तपासणी सुरु केली आहे. मात्र जु-नांदुर्खी - टेंभवली ग्रुप ग्रामपंचायती मधील इतर गाव पाड्यातही साथ नसल्याची माहिती, चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय धरणे यांनी दिली आहे. मात्र जु-नांदुर्खी - टेंभवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत जुनांदुर्खी येथील जुना गाव, कॉलनी, मदारपाडा, शिवाजीनगर, हिरोबा स्टॉप, रायपाडा स्टॉप व खारागोरा हे भाग असून त्यापैकी जुनागाव येथे डेंग्यूची साथ गेल्या काही दिवसांपासून पसरली आहे.
डेंग्यूचा आजाराने मृत्यू :जुना गावमध्ये राहणारी प्रविणा आजारी झाल्यानंतर तिच्यावर स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र आजार नियंत्रणात न आल्याने तिला प्रथम भिवंडीतील आयुष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला भिवंडीतील लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारा दरम्यान तिला डेंग्यूचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या मेंदूला सूज येऊन रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा १० जून रोजी मध्यरात्रीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डेंग्यूचा आजार बळावल्याने तिच्या रक्ताचे नमुने कळवा येथील छत्रपती हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविल्याचे डॉ. धरणे यांनी सांगितले.
नागरिकांच्या रक्ताची तपासणी : दरम्यान, डेंग्यूच्या आजाराची माहिती मिळताच भिवंडी तालुक्यातील टेंभवली आरोग्य उपकेंद्रामार्फत ५ जून पासून शिबीर लावून नागरिकांच्या रक्ताची तपासणी केली होती. त्यापैकी ३२ नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. त्यापैकी ६ नमुने संशयित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु केले. या घटनेची दखल घेत जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेने जुनांदुर्खी मधील जुनागाव येथे येऊन नागरिकांच्या घरांना भेटी दिल्या. तर सद्यस्थितीत टेंभवली आरोग्य उपकेंद्र जुनांदुरखी गावात हलवण्यात आले आहे. तर आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले जात आहे.