कल्याण डोंबिवली (ठाणे) -महापालिका हद्दीत दिवसागणिक 9 ते 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यातच महापालिकेच्या डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोरोनाग्रस्तचा मृतदेह बॉडीबॅग्स ऐवजी चक्क प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून दिला जात आहे. याला महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा हलगर्जीपणा म्हणावा की पैसे कमावण्यासाठी केलेला घोटाळा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर शासनाच्या निर्देशांनुसार संबंधित मृतदेह 'बॉडी बॅग'मध्ये ठेऊन अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक किंवा पालिकेच्या संबधित कर्मचाऱ्याला दिला जातो. पण, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे बॉडीबॅग्स नाहीत किंवा असूनही त्या वापरल्या जात नाहीत, असे या घटनेतून दिसून येत आहे. एकीकडे कोविड संदर्भात कोट्यवधी रुपये खर्च करुन तात्पुरते रुग्णलाय निर्माण करण्याच्या बढाया मारणाऱ्या महापालिकेकडे किंबहुना महाराष्ट्र सरकारकडे जनतेसाठी बॉडीबॅग्स घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत का ?, असा सवाल कोरोना समुपदेशन समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी उपस्थित केला. तर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून दिला जात असल्याचा व्हिडीओ मयुरेश शिर्के यांनी मोबाईल केमेऱ्यात कैद करून तो फेसबुक व्हायरल केल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाय मयुरेश यांनी हा व्हिडीओ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
धक्कादायक ! चक्क प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून दिला जातोय कोरोनाग्रस्ताचा मृतदेह - कल्याण डोंबिवली कोरोनाग्रस्तांचा मृतदेह प्लास्टीकच्या पिशवीत बातमी
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णाला मृतदेह बॉडीबॅग्सऐवजी प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
died body of covid patients
दरम्यान, रविवारी (दि. 9 ऑगस्ट) दिवसभरात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 297 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 440 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्याच्या स्थितीत 4 हजार 667 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजपर्यंत महापालिका क्षेत्रात 22 हजार 452 रुग्णांचा टप्पा पार केला. तर त्यापैकी 17 हजार 345 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तसेच आज दिवसभरात 305 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.