ठाणे -उल्हासनगर ते विठ्ठलवाडी दरम्यान अप व डाऊन रेल्वे मार्गाच्या मध्यभागी अज्ञात गरोदर महिलेचा मृतदेह सापडला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
अज्ञात व्यक्तीने मंगळवारी रात्री रेल्वे नियंत्रण कक्षात फोन करून एक महिला धावत्या गाडीतून पडून जखमी झाल्याची माहिती दिली. ही माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांना मिळताच ते घटनास्थळी गेले. २५ ते ३० वर्षीय वयोगटातील एक गरोदर महिला पडलेली दिसली. तिच्या चेहरा व डोक्याच्या मागे जखमा आणि डावा पाय फॅक्चर झालेला होता. जखमी महिलेला उपचारासाठी मध्यवर्ती रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या महिलेजवळ ओळख पटावी, अशी कोणतीच वस्तू पोलिसांना मिळाली नाही. त्यामुळे तिची ओळख पटणे कठीण झाले आहे.