नवी मुंबई -कोपरखैरणे सेक्टर ११ येथील फाम सोसायटीमध्ये शनिवारी जोरदार पावसामुळे झाड कोसळले. हे झाड पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर पडल्याने यात सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
१७ मे रोजी तौक्ते चक्रीवादळात नवी मुंबईत १२२ झाडे पडली होती. या घटनेनंतर शहरातील धोकादायक वृक्षांची ३१ मे पर्यत छाटणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक वृक्षांची छाटणी सुरू होती. मात्र याचदरम्यान हे झाड कोसळले. यात सहा वाहनांचे नुकसान झाले. एखाद्या सोसायटीमध्ये जर धोकादायक वृक्ष असेल, तर त्याची माहिती सोसायटीच्या वतीने महापालिकेला दिल्यास त्या वृक्षाची छाटणी करण्यात येते. मात्र बऱ्याचवेळेस सोसायट्या याकडे दुर्लक्ष करतात, यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडतात.