ठाणे: गेल्या वर्षी शिवसेना भाजप युती सरकार सत्तेवर आल्याबरोबर कोरोनाचे ग्रहण सुटल्याचे घोषीत केले आणि धूमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. तर यंदा गोविंदाना श्रावण अधिक मास ५९ दिवसाचा आल्याने, गोविंदाच्या सराव पथकात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या वाढीव मुदतीमध्ये जास्तीजास्त सराव करून जास्तीत जास्त बक्षीस पटकावण्याचा मानस ठाण्यातल्या गोविंदा पथकांनी व्यक्त केला आहे.
नियमाचे पालन करून उत्सव साजरा: ठाण्यात देखील गुरूपौर्णिमा पासून गोविंदाच्या पथकांने सरावासाठी जोर धरला आहे. ठाणे शहरात गेली २८ वर्ष नावलौकिक असलेल्या ठाण्याचा राजाच्या गोविंदा पथकाशी सामाजिक कार्यकर्ते जोडले गेले आहेत. गोविंदा हा उत्सव म्हणून साजरा करतो. त्यामुळे राजकीय वातावरणाचा कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास, ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचे राकेश यादव यांनी व्यक्त केला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १४ वर्षाखालील मुलांना घेत नसून, न्यायालयाच्या नियमाचे आधीन राहून उत्सव साजरा करत असल्याचे राकेश यादव यांनी सांगितले.
दहीहंडीची वेळ वाढविण्यात यावा: यंदा दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री १० ऐवजी एक तास वाढवून मिळावी अशी मागणी शासनाकडे दहीहंडी समन्वय समितीने केली आहे. गोविंदाना शहरात ठिकठिकाणी असणाऱ्या हंडीपर्यंत पोहचण्यास रस्त्यावर उत्सवाच्या काळात होणाऱ्या गर्दीमुळे शक्य होत नाही. त्यामुळे दहीहंडीची वेळ वाढविण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्यात यावर्षी साजरा होणारा दहीहंडी उत्सव व समस्त तरुणवर्ग व बाळगोपांचा आवडता सण आहे. समस्त बालगोपाळांच्या कौशल्याने मुले व त्यांच्या उंच थरामुळे सदर उत्सवाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात येतात.
राज्यभरातील गोविंदापथकांच्या प्रलंबित मागण्या
१) बालगोपाळांचा विमा गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे विमा उतरवला होता. यावर्षी सुद्धा समस्त बालगोपांचा विमा महाराष्ट्र शासनातर्फे उतरवण्यात यावा.
२) दहीहंडी यास साहसी खेळाचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे. परंतु याबाबत शासनाकडून पुढे काही उपाययोजना झाल्या नाहीत. तरी सदर साहसी खेळासाठी आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासन व दहीहंडी पथक यांच्या समन्वय साधून या साहसी खेळासाठी स्पर्धा आयोजन कराव्यात.