ठाणे : सायबर क्राईमची कांही उदाहरणे: (17 Terrifying Invisible Faces of Criminals)
(०१) कास्टिंग फ्रॉड : या प्रकारात मोठ-मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या नावाने, 'तुमच्या मुलीला पिक्चर मध्ये काम देतो' म्हणून करारही केले जातात व त्यानंतर फोटोशूट, ड्रेसेसचा खर्च इत्यादी नावाखाली लाखोंनी रक्कम उकळली जाते. या सर्व गोष्टी ऑनलाईन होतात आणि आरोपी कधीही तुमच्या समोर येत नाही. (Cyber Age)
(०२) के.वाय.सी.फ्रॉड (KYC fraud) :यात SMS मध्ये लिंक येते. बँकेचे KYC अपडेट करायचे आहे म्हणून सांगितले जाते. लिंकवर क्लिक केल्यावर डुप्लिकेट वेबसाईट उघडली जाऊन तुमचे सर्व बँक डिटेल्स घेतले जातात व त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात. बँकांचे व्यवहार हे म्हणूनच अधिकृत वेबसाईटवर किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणे हे आवश्यक. (Cyber crime news)
(०३) ॲमेझॉन फ्रॉड :तुम्हाला 'दिवाळी धमाका' 'न्यू इयर धमाका' या प्रकारच्या लॉटरीमध्ये "ॲमेझॉनवर" बक्षीस लागलय' असा फोन येतो, पत्रही पाठवले जाते. फुकट मिळणारी दहा लाखाची कार कोणाला नको असते ,मग त्यांनी दिलेल्या साईटवर आपण ऑनलाइन जातोच. आणि तिथेच फसतो.
(०४) OLX फ्रॉड : यात OLX वर ऑनलाइन आपण 'विकत घेत असलेली वस्तू' अथवा 'आपल्याला विकावयाची वस्तू' या दोन्ही बाबतीत गुन्हे घडू शकतात. बहुतांशी वेळा तुम्हाला संपर्क करणारी व्यक्ती ही स्वतःला सैनिकी क्षेत्रातील असल्याचे दर्शवते, जेणेकरून ती फसवणार नाही याचा आपल्याला विश्वास वाटतो. तशी खोटी सैनिकी ओळख पत्रेही दिली जातात. आपण बँक डिटेल्स शेअर करुन पैसे भरतो, पण वस्तू येत नाही. 'काहीतरी गडबड झाली असावी' असं म्हणून दिलगिरी व्यक्त करून समोरचा आरोपी QR कोड पाठवतो. आपण तो स्कॅन करतो आणि आपले अजूनच पैसे गायब होतात. वस्तू आपल्याला विकायची असेल तर समोरचा फोन करून ऑफर देतो. 'अकाउंट खात्रीसाठी मी आधी रू. १ पाठवतो' असं सांगून तो QR कोड पाठवतो. आपण स्कॅन करतो आणि खरंच रू. १ जमा झाल्यावर आपली खात्री पटून आपण त्याने पाठवलेला दुसरा कोडही स्कॅन करतो आणि आपल्या खात्यातले अजून पैसे गायब होतात. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये QR कोड वापरू नका आणि शक्यतोवर प्रत्यक्ष भेटून व्यवहार करा.
(०५) न्यू इयर फ्रॉड :वर्षअखेर जवळ येत चालली आहे. अशावेळी प्रसिद्ध उपहारगृहांच्या नावाने फेसबुकवर 'एका थाळीवर एक फ्री' अशाप्रकारच्या सवलतीच्या जाहिराती आपल्या पेजवर येत राहतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एका खोट्या फेसबुक पेजवर नेले जाते, तिथे फॉर्म भरून आपण आपले बँक डिटेल्स देतो. तुम्हाला 'तुमची थाळी तयार आहे, बँकेचा OTP शेअर करा' म्हणून मेसेज येतो. तुम्ही तो शेअर करता आणि..बुम! तुमच्या खात्यातले पैसे गायब! एका फ्री थाळीच्या नादात लोकांनी ५०-६० लाख रुपयेही गमावले आहेत.
(०६) गुगल एडिट फ्रॉड : यात बँकांचे, वाईन शॉपस्, पिझ्झा कंपन्यांचे 'कस्टमर केअर नंबर' एडिट करून (बदलून) त्यावरून तुम्हाला फोन केला जातो. त्यावरून तुमची वैयक्तिक माहिती, खात्याची माहिती घेतली जाते आणि बँकेचा ओटीपी मागवला जातो. वाईन किंवा पिझ्झाच्या खरेदीसाठी तुम्ही पैसेही भरता, पण डिलिव्हरी होत नाही. म्हणूनच कस्टमर केअर नंबर्स हे नेहमी अधिकृत साइटवर जाऊन पडताळून बघा आणि मगच व्यवहार करा.
(०७) स्क्रीन शेअर फ्रॉड :ज्यांना मोबाईल किंवा कम्प्युटर बाबत तांत्रिक ज्ञान नाही, विशेषतः वयस्कर व्यक्ती किंवा स्त्रिया, त्यांना यात फसवण्यात येते. 'तुम्हाला हवा तो व्यवहार करण्यास मी मदत करतो' असे सांगून तुमच्या कडून 'स्क्रीन शेअर' नावाचे ॲप डाऊनलोड करून तुमच्या कम्प्युटरचा अथवा मोबाईलचा ताबा समोरची व्यक्ती स्वतःकडे घेते. आणि त्यानंतर ती तुमच्या वैयक्तिक माहितीचा कसा आणि किती गैरवापर करू शकते, ते सांगू शकत नाही!
(०८) इन्शुरन्स फ्रॉड :याचे उदाहरण म्हणजे अगदी करोना काळातील ही घटना. चार-पाच वर्षापूर्वी रिटायर झालेले गृहस्थ, त्यांना मेलवर उत्तम रिटायरमेंट पॅकेज ऑफर करण्यात आले. त्यांनी तीन वर्षे नियमितपणे पैसेही भरले. वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरण्यासाठी त्यांना सूचना मिळत गेल्या तरीही त्यांना संशय आला नाही. सायबर क्राईमच्या या गुन्हेगारांचे हे वैशिष्ट्यच आहे की त्यांचे 'वाचा आणि भाषेवर' जबरदस्त प्रभुत्व असते. दुर्देवाने कोरोना काळात या गृहस्थांचे निधन झाले. पत्नीने इन्शुरन्सच्या रकमेची मागणी केल्यावर पॉलिसी क्लोजरच्या नावाखाली तिच्याकडून अजून पैसे उकळून हि गुन्हेगार मंडळी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून गायब झाली. आपल्या खात्रीच्या इन्शुरन्स एजंट कडून किंवा कंपनी कडूननच पॉलिसी घ्या, ऑनलाइन कॉल्सवर भरवसा ठेवू नका.