ठाणे - मला भाई का बोलला नाही म्हणून एका सराईत गुन्हेगाराने भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने वार (Attack on Youth) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील अशोक सम्राट चौकात घडली आहे.
- तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू -
ठाणे - मला भाई का बोलला नाही म्हणून एका सराईत गुन्हेगाराने भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने वार (Attack on Youth) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील अशोक सम्राट चौकात घडली आहे.
याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हल्लेखोरासह त्याच्या साथीदारांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच हल्लेखोराच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे समोर आले. तर हल्लेखोर विजय शिंदे हा सराईत गुन्हेगार फरार झाला आहे. विशाल भालेराव असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जखमी विशाल भालेराव हा मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमध्ये कुटूंबासह राहतो. त्याचा भाऊ अक्षय भालेराव आणि त्याचे काही मित्र शनिवारी रात्रीच्या सुमारास एका ढाब्यावर पार्टीसाठी गेले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून आपसातच मित्रांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी त्याच ढाब्यावर हल्लेखोर विजय शिंदे आणि रवि वाघे हे उभे होते. यांच्या सोबत वाद होऊ नये म्हणून अक्षयने वाद करणाऱ्या मित्राला बाजूला केले. त्यावेळी अक्षय याने हल्लेखोर विजय शिंदेला विजय बोलून वाद नकोत असे बोलून मित्राला बाजूला केले. त्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास अक्षय घरी येताना हल्लेखोर विजय शिंदेसह त्याच्या साथीदाराने त्याला सम्राट अशोक चौकात अडवून मला विजय का बोलला 'भाई' बोलता येत नाही का? असे बोलत अक्षयला मारहाण केली. त्यानंतर अक्षयने त्याचा भाऊ विशाल भालेरावला मोबाईलवर संपर्क करून घडलेला प्रकार सांगताच काही वेळातच घटनास्थळी विशाल आला होता. तर विशालला काही कळण्याच्या आतच हल्लेखोर विजय शिंदेने विशालवर धारदार शस्त्राने पोटावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. तर हल्ल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या. मुख्य आरोपी विजयसह इतर आरोपींचा शोध सुरू आहे.