ठाणे :महावितरणच्या वीज देयक तपासणी पथकाने या ग्रामस्थाला वीज देयक भरण्यासाठी तगादा लावला होता. तरीही ग्रामस्थ थकीत वीज देयक भरणा करत नव्हता. अखेर पथकाने त्याच्या घराचा वीज पुरवठा खंडित करताच संबंधित ग्रामस्थाने महावितरणच्या पुरुष कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना निळजे गावात घडली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : मानपाडा पोलीस ठाण्यात महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते यांच्या तक्रारीवरून बेदम मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष एकनाथ पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या वीज ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ केल्याची तक्रार महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते यांनी तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दिली.
वीज पुरवठा खंडित केला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण विभागातील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते (वय ३३), विद्युत साहाय्यक रोशनी पाटले, दिगंबर खंडाळकर, केशव मराठे हे साहाय्यक अभियंता चौधरी यांच्या आदेशावरुन वीज देयक थकीत रक्कम वसुल करण्यासाठी निळजे गावात शुक्रवारी सकाळी आले होते. ग्राहकांना समज देऊन त्यांना थकीत रक्कम तातडीने भरण्याची सूचना पथकाकडून केल्या जात होत्या. एकनाथ लडकू पाटील यांच्याकडे मोठ्या रकमेची वीज देयक थकबाकी होती. त्यांना यापूर्वी पथकाने देयक भरणा करा, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, अशी तंबी महावितरणकडून देण्यात आली होती.