ठाणे : एका माजी सैनिकाच्या पत्नीचा सोसायटीच्या मिटिंगमध्ये त्याच सोसायटीत राहणाऱ्या एका रहिवाशाने विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील खोणी परिसरात असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी माजी सौनिकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सोसायटीच्या मिटींगमध्ये घडला प्रकार : भारतीय सैन्यातील सीआरपीएफ पथकातून सेवानिवृत्त सैनिक हे पत्नी आणि मुलीसह सोसायटीत चार वर्षापासून राहत आहेत. त्यातच १२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मिटींग आयोजित करण्यात आली होती. या मिटींगमध्ये सोसायटीमधील ३० ते ४० सदनिकाधारक उपस्थित होते. यापैकी एक महिला सदस्याला हजर असल्याचे पाहून मिटींगमध्ये उपस्थित असलेला आरोपी महेशने त्या महिलेला तू या सोसायटीत राहण्यास लायकीची नाही, तू कशाला आली मिटींगमध्ये, असे बोलून त्या महिलेचा अपमान केला.
भयभीत पीडितेची पोलीस ठाण्यात धाव : महिलेचा अपमान झाल्याचे पाहून माजी सैनिकाच्या पत्नीला राग येऊन तिने आरोपीला हटकले. त्याचा राग आरोपीला आला आणि त्याने माजी सैनिकाच्या पत्नीला शिवीगाळ करत अश्लील हावभाव करत हातवारे केले. या घटनेमुळे मिटींगमध्ये गोंधळ उडाल्याने बांधकाम विकासकाचे मॅनेजर त्यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. तरीही भर मिटींगमध्ये आरोपीने माजी सैनिकाच्या पत्नीला धमकी दिली. यामुळे भयभीत झालेल्या पीडित ४८ वर्षीय माजी सैनिकाच्या पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात १४ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती. यावेळी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. या गुन्ह्याचा अधिक तपास मानपाडा पोलीस करीत आहेत.
हेही वाचा -
- विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले!
- Molested daughter In law : सुनेचा विनयभंग करणाऱ्या सासऱ्याला दहा वर्षांचा कारावास; दिरास दोन वर्षांची शिक्षा
- Thane Crime : स्कूलबसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग, तर शिक्षिकेकडून सातवीच्या विद्यार्थिनीला मारहाण