ठाणे- मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. 'मीच माझा रक्षक' हा संदेश घेऊन Chase The Virus या मोहिमेअंतर्गत मीरा भाईंदर शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन करणार तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिली.
मीरा भाईंदर हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, मुंबईमध्ये राबविण्यात आलेल्या 'Chase The Virus' याच मोहिमेच्या अनुषंगाने संपूर्ण मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात आरोग्य कर्मचारी, शिक्षक, बालवाडी शिक्षिका, अंगणवाडी शिक्षिका, आशा स्वयंसेविका, खाजगी स्वयंसेवक तसेच लोकप्रतिनिधीचा सहभाग घेऊन घर भेटीद्वारे विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या करिता आरोग्य केंद्र स्तरावर ४१७ टीममधील ८३४ कर्मचाऱ्यांमार्फत साधारणतः ३ लाख घराचे सर्वेक्षण पाच दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या सर्वेक्षणामधून सदर आजाराचे संशयित रुग्ण इन्फल्युएन्झा सदृश लक्षणे असणारे उदा. ताप, सर्दी, खोकला, धाप लागणे इतर लक्षणे शोधून त्यांची तपासणी केली जाईल. या मधील कोणतीही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्यास त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. या करिता सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून कोणतीही आरोग्य संबंधित माहिती लपवून ठेऊ नये, जेणे करून रुग्णाचे वेळेत निदान होऊन व वेळेत उपचार होऊन मृत्यूचे प्रमाण देखील कमी होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.